

न्यूयॉर्क : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) एका अमेरिकन अंतराळवीराने टिपलेले हे ऐतिहासिक छायाचित्र ९/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर तत्काळ न्यूयॉर्क शहरावर पसरलेला दाट धुराचा लांबच लांब लोळ दाखवते. या घटनेला पाव शतक उलटून गेल्यानंतरही हे चित्र तितकेच सुन्न करणारे आणि अंगावर काटा आणणारे आहे.
११ सप्टेंबर २००१ च्या सकाळी अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांनी चार प्रवासी विमानांचे अपहरण केले. त्यापैकी दोन विमाने त्यांनी लोअर मॅनहॅटनमधील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या मध्यभागी असलेल्या ११० मजली जुळ्या टॉवर्सवर नेऊन धडकवली. सुमारे १७ मिनिटांच्या अंतराने झालेल्या या दोन भीषण धडकांमुळे शेवटी दोन्ही इमारती कोसळल्या. दुसऱ्या टॉवरवर हल्ला झाल्यानंतर काही वेळातच, तिसरे अपहृत विमान व्हर्जिनियातील आर्लिंग्टन येथील अमेरिकन संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या ‘पेंटागॉन’वर आदळले. तर चौथे विमान, ज्याचा रोख बहुदा वॉशिंग्टन डी.सी.कडे होता, तेथील प्रवाशांनी अपहरणकर्त्यांशी लढा दिल्यामुळे रोखले गेले आणि ते शँक्सव्हिले, पेनसिल्व्हेनिया येथे कोसळले.
‘९/११ मेमोरियल अँड म्युझियम’नुसार, या वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये एकूण २,९७७ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. हल्ल्याच्या वेळी पृथ्वीवर उपस्थित नसलेले एकमेव अमेरिकन नागरिक म्हणजे ‘नासा’चे अंतराळवीर आणि आयएसएस कमांडर फ्रँक कुलबर्टसन. मायदेशात काय घडत आहे, याची माहिती मिळताच त्यांनी काही वेळातच न्यूयॉर्क शहरावरून उड्डाण केले. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे २५० मैल (४०० किलोमीटर) उंचीवरून त्यांनी मॅनहॅटनमधून बाहेर पडणाऱ्या दाट धुराचा हा फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. या छायाचित्राचे बारकाईने निरीक्षण केल्यास, टॉवर्समधून निघणाऱ्या धुराच्या खांबाच्या पायथ्याशी कुलबर्टसन यांनी वर्णन केलेला एक ‘विचित्र फुलोरा’ पाहायला मिळतो. हा भाग बहुधा ‘दुसरा टॉवर कोसळतानाचा किंवा कोसळल्यानंतरचा’ असण्याची दाट शक्यता आहे, असे कुलबर्टसन यांनी स्पष्ट केले होते.