

नवी दिल्ली : थंडीच्या रात्री पांघरुणात स्वतःला पूर्णपणे झाकून घेणे आराम आणि सुरक्षितता देते. आपण पांघरुण तोंडापर्यंत ओढल्याबरोबर आतमध्ये एक उबदार जागा तयार होते, जी बाहेरची थंड हवा, प्रकाश आणि आवाजापासून संरक्षण करते. अनेक लोक या सवयीमध्ये इतका आराम अनुभवतात की त्यांना याच पद्धतीने झोपायला आवडते. पण, ही आरामदायक सवय तुमच्या शरीरावर कसा परिणाम करते, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
जेव्हा आपण चेहरा झाकून झोपतो, तेव्हा पांघरुणाखाली एक उबदार आणि सुरक्षित वातावरण तयार होते. ही उष्णता केवळ आरामच देत नाही, तर मेंदूलाही शांत करते, ज्यामुळे लवकर झोप लागते. पांघरुणाखाली अंधार आणि शांतता मिळाल्याने मेंदूची हालचाल कमी होते आणि आपण लवकर ‘रिलॅक्स’ होतो. मात्र चेहरा झाकून झोपल्यास पांघरुणाखाली कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते आणि ताज्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. तीच गरम, शिळी हवा वारंवार श्वासात घेतल्याने पुढील समस्या उद्भवू शकतात. झोप वारंवार तुटू शकते.
सकाळी उठल्यावर थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी, चक्कर येणे किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. ज्या लोकांना अॅलर्जी, सायनस किंवा अस्थमाचा त्रास आहे, त्यांची लक्षणे वाढू शकतात. पांघरुणाने चेहरा झाकल्यास त्वचेभोवती ओलावा आणि उष्णता वाढते. अशा प्रकारच्या वातावरणात त्वचेला त्रास होऊ शकतो. याशिवाय, पांघरुणामध्ये जमा झालेली धूळ, तेल आणि जीवाणू यांचा चेहर्याशी दीर्घकाळ संपर्क येणे देखील हानिकारक आहे. लहान मुलांसाठी चेहरा झाकून झोपणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. ते स्वतःची चादर किंवा पांघरुण व्यवस्थित बाजूला करू शकत नाहीत, ज्यामुळे हवेचा मार्ग पूर्णपणे बंद होऊ शकतो. यामुळे श्वास गुदमरण्याचा धोका असतो. तुम्हाला उबदारपणा आवडत असेल, तर थर असलेले पांघरुण किंवा जाड रजई वापरा, पण चेहरा उघडा ठेवा. गरम कपडे, मोजे किंवा थर्मल वेअर घाला. डोळ्यांवर प्रकाश नको असेल तर ‘आय मास्क’ वापरा.