

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अफगाणिस्तानातील एक मुलगा विमानाच्या चाकाजवळ बसून काबुलहून दिल्लीला पोहोचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिल्ली एअरपोर्टच्या टर्मिनल तीनवर अधिकार्यांनी या मुलाला प्रतिबंधित क्षेत्रात फिरताना पाहिले आणि त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याने हा धक्कादायक खुलासा केला आहे.
13 वर्षांच्या या मुलाला गुपचूपपणे इराणला जायचे होते. परंतु, तो चुकीने भारतात जाणार्या विमानात अशाप्रकारे लपला. त्यामुळे तो थेट दिल्लीला पोहोचला. या घटनेनंतर काबुल एअरपोर्टवरील सुरक्षेसंदर्भात नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार, के.ए.एम. एअर फ्लाईट क्रमांक आर.क्यू.-4401 ला काबुल ते दिल्ली यायला 94 मिनिटे लागली. यादरम्यान हा अफगाणी मुलगा 94 मिनिटे विमानाच्या पाठच्या चाकावरील भागात लपून राहिला. हे विमान भारतीय वेळेनुसार काबुलहून सकाळी 8.46 वाजता रवाना झाले आणि सकाळी 10.20 वाजता दिल्लीच्या टर्मिनल तीनवर पोहोचले.
तज्ज्ञांच्या मते, व्हील व्हेलमध्ये प्रवास करणे जवळपास अशक्य असते. विमान हवेत उडाल्यानंतर ऑक्सिजन लेव्हल खूपच कमी होते आणि वरची थंडीही भरपूर असते. याशिवाय चाकाजवळ मृत्यूदेखील होऊ शकतो.
कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी सांगितले की, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर व्हील बेचा दरवाजा खुला राहतो. चाक आत जाते आणि हा दरवाजा पुन्हा बंद होतो. हा मुलगा शक्यता आहे की, या बंद जागेत घुसला असेल, जेथे दबाव जास्त असतो आणि तापमान प्रवासी केबिनसारखे असावे. तो स्वत:ला वाचवण्यासाठी आतल्या बाजूला चिकटून लपला असावा. ते म्हणाले की, अशा स्थितीशिवाय 30,000 फूट उंचीवर जिवंत राहणे अशक्य आहे; कारण येथे तापमान खूपच कमी असते.
भारतीय एअरपोर्टवर व्हील बेसमध्ये बसून प्रवास करण्याचे हे दुसरे प्रकरण आहे. या आधी 14 ऑक्टोबर 1996 रोजी प्रदीप सैनी (वय 22) आणि विजय सैनी (19) नावाचे दोन भाऊ दिल्ली ते लंडन अशा प्रवासात ब्रिटिश एअरवेजच्या बोईंग 747 विमानाच्या व्हील बेसमध्ये लपले होते. लंडनला पोहोचताच प्रदीप वाचला, तर विजय याचा मृत्यू झाला होता.
या अफगाणी मुलाने सांगितले की, त्याने काबुल विमानतळावर प्रवाशांच्या मागे गाडी चालवून प्रवेश केला. त्यानंतर विमान सुटण्याच्या वेळेत व्हीलमध्ये तो लपला. हा मुलगा अल्पवयीन असल्याने सध्या त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.