वॉशिंग्टन : सकाळची न्याहरी राजासारखी करावी, अशी म्हण प्रचलित आहे. सकाळची न्याहरी पोटभर केल्याने अनेक फायदे आरोग्याला होतात. त्यातच न्याहरी टाळणार्या लोकांना लठ्ठपणाचा धोका असून त्यांचे पोट सुटण्याचीही शक्यता असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आलेला आहे.
जे लोक सकाळी न्याहरी करणे टाळतात, त्यांतील 26.7 टक्के लोकांमध्ये लठ्ठपणा आढळून आला असून जे लोक नियमित न्याहरी करतात, त्यांच्यामध्ये हे प्रमाण 10.9 टक्के एवढे असल्याचे अमेरिकेतील मायो चिकित्सालयातील संशोधकांना आढळले. त्याचप्रमाणे कधीही न्याहरी न करणार्या लोकांनी मागील काही वर्षांत त्यांच्या वजनात सर्वाधिक वाढ झाल्याची माहिती दिल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. अनियमित न्याहरी करणे हे वजन वाढणे आणि लठ्ठपणाशी संबंधित असल्याचे कधीच न्याहारी न करणार्यांमधील लठ्ठपणाच्या प्रमाणामुळे अधिक स्पष्ट झाले आहेत, असे संशोधकांनी सांगितले. अभ्यासासाठी संशोधकांनी 347 लोकांच्या न्याहरीच्या सवयीचे 2005 पासून 2017 पर्यंत विश्लेषण केले. यामध्ये सहभागी झालेले लोक 18 ते 87 वयोगटातील होते. या अभ्यासात सहभागी झालेल्यांची उंची, वजन, कमरेचा आकार आदी माहिती घेण्यात आली होती. जे लोक न्याहरी टाळतात, त्यांच्या कमरेचे सरासरी माप 97.5 सेमी असून हे नियमित न्याहरी करणार्या लोकांच्या तुलनेने 9.8 सेमी जास्त होते.