King Olaf Silver Coin | नॉर्वेमध्ये सापडले ‘ओलाफ’ राजाचे चांदीचे नाणे

King Olaf Silver Coin |
King Olaf Silver Coin | नॉर्वेमध्ये सापडले ‘ओलाफ’ राजाचे चांदीचे नाणे
Published on: 
Updated on: 

ऑस्लो : नॉर्वेमध्ये पुरातत्त्व संशोधनादरम्यान सापडलेल्या ५,५०० हून अधिक नाण्यांच्या प्रचंड खजिन्यातून प्रसिद्ध वायकिंग राजाच्या काळातील एक अत्यंत दुर्मीळ चांदीचे नाणे हाती लागले आहे. हे नाणे स्वतः राजाच्या हातात राहिले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. या नाण्यावर नॉर्वेचा राजा ‘ओलाफ हॅराल्डसन’ याचे नाव कोरलेले आहे. ओलाफने इसवी सन १०१५ ते १०२८ या काळात राज्य केले असून, त्याला ‘सेंट ओलाफ’ किंवा ‘ओलाफ द होली’ (पवित्र ओलाफ) म्हणून ओळखले जाते. तो नॉर्वेचा राष्ट्रीय संत म्हणून पूजनीय मानला जातो.

ऑस्लो विद्यापीठाच्या ‘म्युझियम ऑफ कल्चरल हिस्ट्री’ने जारी केलेल्या पत्रकानुसार, राजा ओलाफच्या कारकिर्दीत पाडली गेलेली २० पेक्षाही कमी नाणी आजवर जगभरात सापडली आहेत. त्यामुळे नव्याने सापडलेले हे नाणे नॉर्वेसाठी एक ‘राष्ट्रीय खजिना’ मानले जात आहे. ऑस्लो विद्यापीठातील नाणेशास्त्र तज्ज्ञ स्वेन गुलबेक यांनी सांगितले, ‘या नाण्याच्या एका बाजूला राजाची प्रतिमा आणि क्रॉस (ख्रिस्ती धर्मचिन्ह) आहे, तर दुसऱ्या बाजूला आणखी एक क्रॉस कोरलेला दिसतो. हे मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराचा संदेश देणारे नाणे आहे.’

नॉर्वेमध्ये ख्रिश्चन धर्माचा पाया रचण्याचे श्रेय राजा ओलाफला दिले जाते. त्याच्या याच प्रयत्नांमुळे पुढील एका पिढीनंतर नॉर्वेचे पूर्णपणे ख्रिस्तीकरण घडून आले. ‘राजा ओलाफने नवीन धर्माला मान्यता मिळवून देण्यासाठी आणि युरोपीय स्तरावर स्वतःची ओळख एक ख्रिश्चन राजा म्हणून प्रस्थापित करण्यासाठी चलनी नाण्यांचा वापर कसा केला, हे यावरून स्पष्ट होते. हा एक प्रकारे त्या काळातील ब्रँडिंगचाच भाग होता,’ असे गुलबेक यांनी स्पष्ट केले. तरुण वयात इंग्लंड आणि फ्रान्सवर झालेल्या वायकिंग आक्रमणांमध्ये सहभागी झाला असताना ओलाफला ख्रिश्चन धर्माची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुमारे इसवी सन १०१३ मध्ये फ्रान्समधील रूआन शहरात त्याचा बाप्तिस्मा झाला आणि त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news