

मेलबोर्न : माणूस आणि अन्य प्राण्यांमध्ये लिंगनिश्चिती एकाच जनुकामुळे होते. त्यामुळे या जनुकाला लिंगनिश्चितीचा 'मास्टर स्विच' मानले जाते. अर्थात, प्लॅटीफिशसारख्या काही प्रजातींमध्ये जनुकांची एक पूर्ण 'संसद'च मिळून भ्रुणाचे लिंग निश्चित करीत असते. एका नव्या विश्लेषणात वैज्ञानिकांनी या संशोधनांवर एक नजर टाकली. त्यामधून त्यांना आढळले की लिंगनिश्चिती ही सर्वसाधारणपणे एकाच जनुकाद्वारे होत असते.
सस्तन प्राण्यांमध्ये मादीत दोन एक्स गुणसूत्रे असतात तर नरात एक एक्स व एक वाय गुणसूत्र असते. वाय गुणसुत्रात 'एसआरवाय' नावाचे जनुक असते जे 'मास्टर स्विच'च्या रूपात कार्य करते. एक 'एक्सवाय' भ्रुण जो 'एसआरवाय' युक्त असतो तो नर म्हणून जन्मतो. तसेच एक 'एक्सएक्स' भ्रुण 'एसआरवाय' नसलेला असतो जो मादी म्हणून जन्मतो. माद्यांनी बनवलेल्या स्त्रीबीजात एकल एक्स गुणसूत्र असते तर नराच्या शुक्राणूंमध्ये अर्ध्यामध्ये एक्स तर अर्ध्यामध्ये वाय गुणसूत्र असते.
'एक्स-एक्स' गुणसूत्रे एकत्र आली तर स्त्रीभ्रुण व 'एक्स-वाय' गुणसूत्रे एकत्र आली तर नर भ्रुण विकसित होत असते. नराकडून आलेल्या 'वाय' गुणसुत्रामुळेच नर भ्रुण विकसित होत असतो. मादीकडून केवळ 'एक्स' गुणसूत्रेच येत असतात. त्यामुळे मनुष्यांमध्येही मुलगा होणार की मुलगी हे आईवर नव्हे तर सर्वस्वी वडिलांवरच अवलंबून असते.