

वॉशिंग्टन : मांजरांच्या मूत्रात अत्यंत गुंतागुंतीचे आणि गुप्त रासायनिक संदेश दडलेले असतात, ज्यांच्या मदतीने त्या एकमेकांची ओळख पटवतात आणि संवाद साधतात. शास्त्रज्ञांनी आता या रासायनिक संकेतांचा शोध लावून हे गूढ उलगडण्यात यश मिळवले आहे.
संशोधकांच्या माहितीनुसार, मांजरी आपल्या मूत्रातील विशिष्ट रसायनांचा वापर करून आपल्या परिसरातील इतर मांजरींना स्वतःचे वय, लिंग, आरोग्य आणि लैंगिक स्थिती याबद्दलची अचूक माहिती देतात. मांजरी एका विशिष्ट जागी मूत्रविसर्जन करून किंवा गंध सोडून आपली हद्द निश्चित करतात, हे मानवाला पूर्वीपासून माहीत होते; मात्र या गंधात नेमकी कोणती माहिती दडलेली असते, याचा अचूक उलगडा संशोधकांनी प्रथमच केला आहे.
संशोधकांनी मांजरांच्या मूत्रातील विविध सेंद्रिय घटकांचे (Volatile Organic Compounds) विश्लेषण केले. त्यात त्यांना असे आढळून आले की, प्रत्येक मांजराच्या मूत्रातील रसायनांचे प्रमाण वेगळे असते, जे एखाद्या ‘फिंगरप्रिंट’प्रमाणे (ठशासारखे) काम करते. यामुळे मांजरींना दूरवरूनही आपल्या परिसरातील इतर मांजरांची ओळख पटवता येते. या संशोधनामुळे मांजरांचे सामाजिक वर्तन आणि त्यांची संवाद साधण्याची पद्धत अधिक स्पष्ट झाली असून, पाळीव मांजरांच्या वर्तनातील समस्या समजून घेण्यासाठी याचा मोठा फायदा होणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.