वैज्ञानिकांनी शोधले नवे प्रभावी अँटिबायोटिक

वैज्ञानिकांनी शोधले नवे प्रभावी अँटिबायोटिक

लंडन : वैज्ञानिकांनी अँटिबायोटिकची एक पूर्णपणे नवी श्रेणी शोधली आहे, जी औषधांना न जुमानणार्‍या व मानवी आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका बनलेल्या तीन जीवाणूंपैकी एकाचा नायनाट करू शकते. याचा अर्थ मानवी शरीरातील जो बॅक्टेरिया अँटिबायोटिक औषधांबाबत प्रतिकारक शक्ती निर्माण करून तग धरून राहतो, ज्याच्यावर औषधांचा कोणताही परिणाम होत नाही, अशा बॅक्टेरियालाही हे नवे अँटिबायोटिक नष्ट करू शकते. या अँटिबायोटिकचे नाव 'जोसुराबलपिन' असे आहे. त्याने न्यूमोनिया आणि सेप्सिसच्या माऊस मॉडेलमध्ये कार्बापेनम-प्रतिरोधी एसिनेटोबॅक्टर बाउमानी (क्रॅब) च्या अत्याधिक ड्रग रेझिस्टंट स्ट्रेनलाही हरवले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने 'क्रॅब'ला अन्य दोन ड्रग रेझिस्टंट बॅक्टेरिया असलेल्या स्युडोमोनास एरुगिनोसा आणि एंटरोबॅक्टिरियासीबरोबर रोगजनक जीवांच्या पहिल्या वर्गात समाविष्ट केले होते. इंपिरियल कॉलेज लंडनमध्ये आण्विक सूक्ष्म जीवविज्ञान विषयातील तज्ज्ञ डॉ. अँर्ड्यू एडवर्डस् यांनी सांगितले कीस रुग्णालयांमध्ये संक्रमणाचे एक प्रमुख कारण 'क्रॅब' हे आहे. विशेषतः जे लोक व्हेंटिलेटरवर असतात, त्यांच्यासाठी त्याचा धोका अधिक असतो. अर्थात, तो आक्रमक रोगजंतू नसून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अँटिबायोटिक औषधांबाबत प्रतिरोधक क्षमता निर्माण झाल्याने तो धोकादायक बनलेला आहे.

त्यामुळे त्याचा संसर्ग झाल्यावर त्याच्यावर उपचार करणे अतिशय कठीण बनते. संक्रमक रोगांचे तज्ज्ञ आणि नव्या औषधाचे शोधकर्ता डॉ. मायकल लोब्रिट्ज यांनी सांगितले की, या बॅक्टेरियाविरुद्ध कोणत्याही औषधाचा विकास करणे हे अत्यंत आव्हानात्मक होते. याचे कारण म्हणजे हा जीवाणू अँटिबायोटिक औषधांना आपल्या बाह्य पेशींच्या स्तरामधून पुढे जाण्यास रोखू शकण्यात अत्यंत कुशल आहे. त्यामुळे हे नवे औषध आता नवी आशा घेऊन आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news