न्यूयॉर्क : अंतराळात सातत्याने काही ना काही घडत असते आणि त्यावर संशोधक, शास्त्रज्ञ बारीक लक्ष ठेवून असतात. आता शास्त्रज्ञांना अंतराळात अशी हालचाल दिसून आली आहे, जी यापूर्वी क्वचितच नजरेस आली असेल. दूरवरील आकाशगंगेत एका विचित्र घटनेने खगोल शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले असून, सायन्स अॅडव्हान्सेसमध्ये याबाबतचा अभ्यास प्रकाशित झाला आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पथकाने ब्लॅक होलबाबत समजून घेण्याबाबत हा एक गेम चेंजर शोध ठरू शकतो. ज्यामुळे ब्रह्मांड अधिक आश्चर्यकारक आणि अपेक्षेपेक्षा अधिक सक्रिय दिसू शकते, असा दावा यावेळी केला आहे.
सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल जितके अपेक्षित आहे, तितके शांत नाही. ही एक नवीन आणि आश्चर्यकारक हालचाल आहे, जी यापूर्वी कधीही ब्लॅक होलमध्ये पाहिली गेली नव्हती. एका अतिमॅसिव्ह ब्लॅक होलमध्ये दर 8.5 दिवसांनी खगोलीय हालचाल होते आणि नंतर ती शांत स्थितीत परत येते; पण शांत होण्याआधी ती एक वायू उत्सर्जित करते, असे या नव्या अभ्यासात म्हटले आहे. आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या एका सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलभोवती फिरणारे एक लहान ब्लॅक होल यांच्या अंतक्रियेमुळे एक विचित्र घटना घडली आहे. एक लहान ब्लॅक होल मोठ्या ब्लॅक होलला खात आहे, असाही त्यांचा दावा आहे.
लहान ब्लॅक बोल सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलच्या अॅक्रिशन डिस्क, वायू आणि धूळ यांच्या फिरत्या भागातून जाते. मग त्या डिस्कमध्ये गडबड होते आणि त्याचे गुरुत्वाकर्षण डिस्कचा वायू आणि धूळ खेचते. या व्यत्ययामुळे, डिस्कमधून गॅस बाहेर पडतो. लहान ब्लॅक होलच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे बाहेर पडलेला पदार्थ अवकाशात फेकला जातो, त्यामुळे वायूचा स्फोट होतो. प्रत्येक वेळी जेव्हा लहान ब्लॅक होल कक्षा पूर्ण करते आणि डिस्कमधून जाते, त्यावेळी गॅसचे नवीन स्फोट घडवून आणते.
जेव्हा वायू बाहेर येतो तेव्हा तो चमकतो आणि नंतर त्याच्या सामान्य स्थितीत परत येतो, ज्याला शास्त्रज्ञ 'खगोलीय उचकी' म्हणतात. डिस्क तारे, अवशेष आणि अगदी इतर ब्लॅक होल्सनी भरलेली असू शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.