

वॉशिंग्टन : आपल्या ग्रहमालिकेतील एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह म्हणजे शनी. शनीचे सर्वात ठळक दिसणारे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या भोवती असणारी कडी. आता हीच कडी हळूहळू गायब होत असल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. 1980 पासूनच खगोलशास्त्रज्ञांना माहिती आहे की शनीच्या वातावरणाचा वरील स्तर सातत्याने या बर्फाळ कडीचा र्हास घडवून आणत आहे. शनी ग्रहावर होत असलेल्या बर्फ वर्षावातून इतके पाणी बनत आहे की त्यापासून एक ऑलिम्पिक स्विमिंग पूल भरू शकतो. त्यावरूनच ही कडी किती वेगाने नष्ट होत चालली आहे याचा अंदाज येऊ शकतो.
शनीची ही कडी नेमकी कधी पूर्णपणे नष्ट होऊन जाईल हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, आता जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या सहाय्याने या कडीच्या र्हासासंबंधीची सर्व माहिती समजू शकेल. 'जेम्स वेब'ने आपल्या अत्यंत शक्तिशाली उपकरणांच्या सहाय्याने अशी कामगिरी करून दाखवली आहे जी आजपर्यंत कोणत्याही दुर्बिणीने केली नव्हती.
या अंतराळ दुर्बिणीने अवकाशातील सर्वात दूरवरील प्रकाशाची प्रतिमा टिपली आहे. जपान एअरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीचे एक वैज्ञानिक जेम्स ओ डोनोग्यू यांनी सांगितले की आम्ही या कडीच्या नष्ट होण्याच्या वेगाचा छडा लावत आहोत. ही कडी इतक्याच नष्ट होईल असे नाही. आगामी काही लाख वर्षे तरी ती अस्तित्वात राहील. मात्र, हा काळ नेमकेपणाने समजून घेण्यासाठी आता जेम्स वेब दुर्बिणीची मदत होऊ शकते.
हवाईतील केक ऑब्झर्व्हेटरीचाही त्यासाठी वापर केला जात आहे. 'नासा'च्या कॅसिनी मोहिमेत समजले होते की शनी ग्रहावर प्रत्येक सेकंदाला 400 ते 2800 किलो बर्फ कोसळत आहे. जर बर्फाचा असाच वर्षाव होत राला तर पुढील 30 कोटी वर्षांमध्ये शनीची कडी पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. एका अनुमानानुसार ही कडी दहा कोटी वर्षांमध्ये नष्ट होईल किंवा त्यासाठी 1 अब्ज वर्षांचाही कालावधी लागू शकतो.