मॉस्को : रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला आता दोन महिने पूर्ण झाले आहेत. अजूनही हे विनाशकारी युद्ध सुरूच आहे. बलाढ्य रशियाचा युक्रेन चिकाटीने सामनाही करीत आहे. अशा वेळी युक्रेनमधील एका लष्करी श्वानानेही जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्विटरवर 'पॅट्रॉन' नावाच्या या सर्व्हिस डॉगचे आभार मानले आहेत. त्याचे कारण म्हणजे या श्वानाने दीडशेहून अधिक स्फोटके शोधून काढली आहेत!
या श्वानाने चेर्निहाईव्ह या युक्रेनियन शहराजवळ स्फोटके शोधून ती निकामी करणार्या टीमबरोबर काम केले. ट्विटरवर म्हटले आहे की पॅट्रॉन हा चेर्निहाईव्हमधील सर्व्हिस डॉग आहे. रशियन आक्रमण सुरू झाल्यापासून त्याने युक्रेनमध्ये 150 हून अधिक स्फोटके शोधली आहेत. युक्रेनियन शहरे पुन्हा सुरक्षित करण्यासाठी डेमिनर्ससोबत काम करीत आहे. तुमच्या सेवेबद्दल खूप खूप धन्यवाद!'
या श्वानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात शेअर करण्यात आले आहेत. त्यामध्ये तो आपले कर्तव्य बजावत असताना दिसून येतो. तो दोन वर्षांचा असून जॅक रसेल टेरियर प्रजातीचा आहे. त्याच्यावर आता एखादा चित्रपटही बनवला जाईल असे म्हटले जात आहे.