अ‍ॅमेझॉनच्या जंगलात दोन हजार वर्षांपूर्वीच्या शहराचे अवशेष

अ‍ॅमेझॉनच्या जंगलात दोन हजार वर्षांपूर्वीच्या शहराचे अवशेष

क्विटो : अ‍ॅमेझॉनच्या वर्षावनात हरवलेल्या एका प्राचीन शहराचा शोध घेण्यात आला आहे. दोन हजार वर्षांपूर्वीचे हे शहर घनदाट जंगलात डोंगराजवळ लपलेले होते. एकेकाळी या शहरात दहा हजार लोक राहत होते. सुमारे एक हजार वर्षे हे शहर नांदते होते. इक्वेडोरमध्ये हे शहर असून पुरातत्त्व संशोधकांच्या मते, ते शेतकर्‍यांचे निवासस्थान होते. याठिकाणी रस्ते, बाजारपेठा, शेती आणि कालवे होते. लेसर सेन्सर टेक्नॉलॉजीने अँडीज पर्वताच्या पायथ्याशी अनेक शतकांपासून साठलेल्या मातीच्या थरांखाली या रस्त्यांचे जाळे लपले होते.

याठिकाणी असलेले रस्ते अतिशय सरळ होते. याठिकाणी तीन मीटरपर्यंत उत्खनन करण्यात आले आणि तेथील रस्ते उघड केले. सुमारे सहा हजार मातीच्या टेकड्यांवर आवासीय तसेच अन्य गरजेच्या वास्तू बनवण्यात आल्या होत्या. याठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठीचे खड्डे आणि अनेक कृषी क्षेत्रे होेती. याठिकाणी असलेला सर्वात रुंद रस्ता 33 फूट रुंदीचा होता. तो दहा ते 19 किलोमीटरपर्यंत जात होता. फ्रान्सच्या नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चचे संशोधक अँटोनी डोरिसन यांनी याबाबतचे संशोधन केले.

याठिकाणी किमान दहा हजार व जास्तीत जास्त पंधरा ते तीस हजार लोकही राहत होते असे अनुमान आहे. ही लोकसंख्या रोमन काळातील लंडनच्या अनुमानित लोकसंख्येइतकी आहे. प्राचीन काळातील अ‍ॅमेझॉन जंगल राहण्यायोग्य होते की नाही याबाबतच्या प्रश्नाचे उत्तर हे शहर देते. या क्षेत्रात गेल्या वीस वर्षांच्या काळात काही पिरॅमिड व मातीच्या इमारतींचे अवशेषही आढळले आहेत. तेथील उपानो लोक इसवी सनपूर्व 300 आणि 600 च्या दरम्यान रहस्यमय पद्धतीने गायब झाले होते. त्यानंतर दोनशे वर्षांनी याठिकाणी हुआपुला संस्कृतीशी निगडीत लोक आले. त्यानंतर युरोपियन लोक दक्षिण अमेरिकेत आले. ते येईपर्यंत हे शहर जंगलाच्या विळख्यात अडकले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news