

बीजिंग : मध्य आशियातील शियोंग्नू साम्राज्याच्या एका उच्चभ्रू भटक्या व्यक्तीचे २,००० वर्षांपूर्वीचे अवाढव्य थडगे पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी उत्खननात शोधून काढले आहे. नऊ स्तरांचे हे थडगे मंगोलियात आतापर्यंत सापडलेल्या शियोंग्नू थडग्यांपैकी सर्वात मोठे असून, त्यात रोमन काळातील काचेच्या प्यालासह ४०० हून अधिक दफनवस्तू सापडल्या आहेत.
मंगोलियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या पुरातत्त्व संस्थेच्या आणि मंगोलियाच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या सहकार्याने ‘नॅशनल म्युझियम ऑफ कोरिया’च्या संशोधकांनी उत्तर मंगोलियातील ड्युरलिग नार्स येथे चार वर्षे उत्खनन केले. या दरम्यान संपत्तीने भरलेले हे भव्य थडगे शोधण्यात आले, अशी माहिती कोरियाच्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या अनुवादित निवेदनात देण्यात आली आहे. ड्युरलिग नार्स हे शियोंग्नू साम्राज्याचे सर्वात मोठे कुलीन दफनस्थळ असून, येथे ‘कुर्गान’ नावाचे सुमारे ३०० प्राचीन दफन ढिगारे आहेत. ‘हुन्नू’ म्हणूनही ओळखले जाणारे शियोंग्नू हे भटक्या जमातींचे एकत्रीकरण होते, ज्यातून इ.स.पूर्व २०९ मध्ये मंगोलियन गवताळ प्रदेशात एक गतिमान साम्राज्य उदयास आले.
पश्चिमेकडील रोमन साम्राज्यापासून पूर्वेकडील चीन आणि कोरियन द्वीपकल्पापर्यंत पसरलेल्या विस्तृत व्यापारी जाळ्याशी शियोंग्नू जोडलेले होते. इ.स.पूर्व पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात शियोंग्नू साम्राज्यात फूट पडल्यानंतर एक गट पश्चिमेकडे सरकला आणि इतर जमातींना सोबत घेत पुढे ‘हूण’ या नावाने ओळखला जाऊ लागला. शियोंग्नू आणि हूण या दोन्ही गटांचे युद्धकौशल्य आणि घोडस्वारी प्रसिद्ध होती. निवेदनानुसार, नव्याने समोर आलेले हे थडगे साधारण चौकोनी आकाराचे असून, त्याला एक लांब मार्ग जोडलेला आहे. या मार्गासह थडग्याची लांबी सुमारे २४० फूट (७३ मीटर) असून, ती गिझाच्या ‘ग्रेट स्फिंक्स’च्या आकाराइतकी आहे.
पुरातत्त्वशास्त्रज्ञांना दगडांचे नऊ समकेंद्री थर आढळले असून, प्रत्येक खालचा थर आधीच्या थरापेक्षा लहान आहे. हे थर सुमारे ४८ फूट (१४.५ मीटर) खोलीपर्यंत गेले असून, त्यामुळे या थडग्याला एक प्रकारे उलट्या पिरॅमिडचे स्वरूप प्राप्त झाले आहे. थडग्याच्या मध्यवर्ती कक्षात लाकडी दफनकक्ष आणि त्यामध्ये शवपेटी सापडली आहे. हा दफनकक्ष शियोंग्नूच्या इतर उच्चभ्रू थडग्यांमधील कक्षांपेक्षा लहान आहे. हे थडगे इ.स. पहिल्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते दुसऱ्या शतकादरम्यान बांधले गेले असावे आणि त्या काळात समाजात बदल होत असून शियोंग्नूंची सत्ता ऱ्हासाकडे झुकत होती, असा अंदाज यावरून व्यक्त केला जात आहे. या थडग्यात सापडलेल्या कलाकृतींमधून २,००० वर्षांपूर्वी युरेशिया खंडातील शियोंग्नूंच्या संपर्काची व्याप्ती स्पष्ट होते.
या दफनवस्तूंमध्ये घोड्यांच्या सजावटीसाठी घडवलेले चांदी आणि क्वार्ट्जचे अलंकार, तसेच लॅकरचा मुलामा दिलेल्या घोडागाडीचे चाक यांचा समावेश आहे. यावरून हे थडगे उच्च सामाजिक स्थान असलेल्या व्यक्तीचे असावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, पुरातत्त्वशास्त्रज्ञांना हान राजवंशाशी असलेल्या संबंधांचेही पुरावे आढळले आहेत. हा राजवंश इ.स.पूर्व २०० च्या सुमारास उदयास आला होता आणि तो प्राचीन चीनमधील दुसरा शाही राजवंश होता. लाकडी शवपेटीच्या तळाशी पुरातत्त्वशास्त्रज्ञांना जेड दगडाचे एकमेकांवर रचलेले १५ सपाट तुकडे सापडले आहेत.