

वॉशिंग्टन : नृत्याच्या मंचावर सामान्यतः माणसे आपल्या कलागुणांनी आणि हालचालींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. मात्र, ‘अमेरिकाज गॉट टॅलेंट’ या प्रसिद्ध शोच्या मंचावर ही कथा काहीशी वेगळी होती. येथे मानवांसोबत मंचावर उतरलेल्या ह्युमनॉईड रोबोंनी आपल्या भन्नाट मूव्सने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. चिनी डांसर वू युफेई याच्यासोबत ‘युनिट्री’ कंपनीच्या G1 ह्युमनॉईड रोबोंनी असा काही परफॉर्मन्स दिला की सर्वच अवाक् झाले. सुरुवातीपासूनच रोबो आणि डान्सरमध्ये उत्तम समन्वय दिसून आला. काही वेळातच या डान्समध्ये मार्शल आर्टस्च्या स्टेप्स समाविष्ट झाल्या आणि या ॲक्टचा अंदाज पूर्णपणे बदलून गेला. हवेत झेप घेताना व बॅकफ्लिप मारताना रोबो यावेळी दिसले.