

जेनिटा : ‘जगात खरंच भूत असते का?’ या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकालाच जाणून घ्यायचे असते. जगातील सर्वात मोठी विज्ञान प्रयोगशाळा असलेल्या ‘सर्न’मधील शास्त्रज्ञांसोबतही गेल्या 20 वर्षांपासून असेच काहीतरी घडत होते, ज्याला सर्वजण प्रयोगशाळेतील ‘भूत’ समजू लागले होते. मात्र, आता शास्त्रज्ञांनी गेल्या दोन दशकांपासून लपलेल्या या भुतामागील खरे वैज्ञानिक कारण शोधून काढले आहे. स्वित्झर्लंडच्या जमिनीखाली बनवलेल्या एका महाकाय मशिनमध्ये शास्त्रज्ञ अशा एका अद़ृश्य शक्तीचा किंवा अडथळ्याचा पाठलाग करत होते, जो त्यांच्या प्रयोगांना सातत्याने खराब करत होता. अखेर पहिल्यांदाच शास्त्रज्ञांच्या एका पथकाने या अद़ृश्य समस्येचे मूळ शोधून ती दूर केली आहे.
‘सर्न’ या प्रयोगशाळेत ‘सुपर प्रोटॉन सिंक्रोट्रॉन’ नावाची सुमारे 4 मैल (6.4 किलोमीटर) लांबीची एक वर्तुळाकार मशिन आहे, जी 1970 च्या दशकापासून कार्यरत आहे. ही मशिन जगातील सर्वात शक्तिशाली पार्टिकल एक्सीलेटर ‘लार्ज हॅड्रॉन कोलाइडर’ (LHC) मध्ये ‘पार्टिकल बीम’ म्हणजेच कणांचे किरण पाठवण्याचे काम करते. गेल्या 20 वर्षांपासून येथे काम करणारे शास्त्रज्ञ एका गोष्टीमुळे प्रचंड त्रस्त होते की, या मशिनच्या आत जाताच हे कण आपला रस्ता कसे भरकटतात? आणि त्यांची ऊर्जा किंवा ताकद अचानक कशी कमी होते? गणिताच्या सिद्धांतानुसार तिथे काहीतरी गडबड होती; पण शास्त्रज्ञांना ती उघड्या डोळ्यांनी दिसत नव्हती आणि त्याचे कारणही समजत नव्हते.
यामुळेच येथील लोक गंमतीने या समस्येला मशिनचे ‘भूत’ म्हणू लागले होते. या संदर्भातील संशोधन ‘नेचर फिजिक्स’ या प्रसिद्ध सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. विज्ञान जगतात या अद़ृश्य अडथळ्याला ‘रेझोनन्स’ असे म्हणतात. हे आपण एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊ शकतो- जेव्हा तुम्ही हातामध्ये कॉफीने भरलेला कप घेऊन चालता, तेव्हा तुमच्या प्रत्येक पावलासोबत कॉफीमध्ये लहरी (लाटा) तयार होतात. जर तुम्ही जास्त वेगाने चाललात, तर या लहरी कपाच्या बाहेर सांडू लागतात. तशाच प्रकारे, जेव्हा या मशिनच्या आत कण प्रकाशाच्या वेगाने धावतात, तेव्हा मशिनमधील चुंबकीय क्षेत्रातील एका लहानशा त्रुटीमुळे कणांमध्ये अशाच लहरी निर्माण व्हायच्या. यामुळे हे कण आपल्या मूळ मार्गावरून भरकटायचे आणि नाहीसे व्हायचे. परिणामी, शास्त्रज्ञांच्या प्रयोगाचा संपूर्ण डेटा खराब होत असे.
या समस्येचा छडा लावणे अत्यंत कठीण होते. कारण, हा अडथळा ‘फोर-डायमेंशनल’ म्हणजेच 4डी स्पेसमध्ये काम करत होता. बहुतेक शास्त्रज्ञ केवळ एकाच दिशेने पाहू शकत होते. मात्र, ‘सर्न’ आणि जर्मनीच्या ‘जीएसआय’ केंद्रातील तीन शास्त्रज्ञांच्या पथकाने एक नवीन तंत्रज्ञान विकसित केले. त्यांनी तब्बल 3,000 वेळा कणांच्या जाण्या-येण्याच्या मार्गाचा माग काढला आणि अखेर या ‘4डी’ अडथळ्याचा एक अचूक नकाशा तयार केला. या यशस्वी संशोधनानंतर आता शास्त्रज्ञ ही समस्या कायमची संपवण्याच्या तयारीत आहेत. यामुळे येणार्या काळात विश्वाची उत्पत्ती आणि त्यामागील गूढ रहस्ये समजून घेणे अधिक सोपे होणार आहे. एवढेच नव्हे तर, या शोधातून जे गणितीय सूत्र मिळाले आहे, त्याच्या मदतीने वैज्ञानिक आता ‘फ्युजन एनर्जी’द्वारे प्रदूषणमुक्त आणि अमर्याद वीज निर्माण करणारी यंत्रे (मशिन्स) तयार करू शकणार आहेत.