Raw Milk Risks | सोशल मीडियावर ‘रॉ मिल्क’चा प्रचार; जाणून घ्या धोके...

Raw Milk Risks |
Raw Milk Risks | सोशल मीडियावर ‘रॉ मिल्क’चा प्रचार; जाणून घ्या धोके...
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या कच्च्या दुधाचा (रॉ मिल्क) मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरू आहे. कोणी याला आरोग्याचा खजिना म्हणत आहे, तर कोणी दूध उकळल्याने किंवा गरम केल्याने त्यातील सर्व पोषक तत्त्वे नष्ट होतात, असा दावा करत आहे. काही इन्फ्लुएन्सर्स तर कच्चे दूध प्यायल्याने ॲलर्जी, दमा आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो, असेही सांगत आहेत. हे दावे ऐकून अनेक जण सामान्य दूध सोडून कच्च्या दुधाकडे आकर्षित होत आहेत. मात्र, कच्चे दूध खरोखरच इतके फायदेशीर आहे का? ते गरम न करता प्यायल्याने शरीराला अधिक प्रथिने (प्रोटिन), कॅल्शियम आणि इतर पोषक तत्त्वे मिळतात का?

तज्ज्ञांच्या पथकाने या दाव्यांमागचे सत्य शोधण्याचा प्रयत्न केला असता अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. सोशल मीडियावर अशा अनेक इन्फ्लुएन्सर्सचे व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यात कच्चे दूध पिण्याचे आरोग्याला अधिक लाभ होतात, असा दावा केला जातो. कच्चे दूध म्हणजे असे दूध, ज्यावर सुरक्षिततेसाठी कोणतीही उष्णता देण्याची (गरम करण्याची) प्रक्रिया केलेली नाही. पाश्चरायझेशन ही दूध सुरक्षित करण्याची एक वैज्ञानिक पद्धत आहे. यामध्ये दुधातील रोग पसरवणारे धोकादायक जिवाणू नष्ट व्हावेत, यासाठी दूध एका ठराविक तापमानावर गरम केले जाते. ऑस्ट्रेलियामध्ये मानवी सेवनासाठी कच्चे दूध विकणे बेकायदेशीर आहे.

यामागील मुख्य कारण म्हणजे त्यापासून होणारे आरोग्याचे धोके. संशोधकांनी स्पष्ट केले आहे की, कच्चे दूध प्यायल्याने कोणताही अतिरिक्त फायदा होत नाही; उलट त्याच्या सेवनाने आरोग्याला अपाय होण्याचा धोका मात्र नक्कीच वाढतो. कच्च्या दुधामध्ये अनेक प्रकारचे असे जिवाणू असू शकतात, ज्यामुळे माणसे गंभीर आजारी पडू शकतात. यातील दोन प्रमुख जिवाणू असे: लिस्टेरिया : हा असा जिवाणू आहे, जो शरीरात संसर्ग निर्माण करू शकतो. गरोदर महिला आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींसाठी हा विशेषतः धोकादायक ठरू शकतो.

साल्मोनेला : हा जिवाणू पोट आणि आतड्यांमध्ये संसर्ग निर्माण करू शकतो. यामुळे उलट्या, जुलाब, ताप आणि गंभीर आजार होऊ शकतो. कच्च्या दुधाच्या समर्थनात सर्वात मोठा दावा असा केला जातो की, दूध गरम केल्याने त्यातील पोषक तत्त्वे नष्ट होतात. मात्र, वैज्ञानिक पुरावे या दाव्याला दुजोरा देत नाहीत. संशोधनानुसार, दूध गरम केल्याने त्यातील प्रथिनांच्या गुणवत्तेवर कोणताही विशेष परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे कॅल्शियमसारख्या आवश्यक खनिजांच्या प्रमाणावरही परिणाम होत नाही. थोडक्यात, गरम केलेल्या दुधाच्या तुलनेत कच्चे दूध प्यायल्याने शरीराला कोणतेही विशेष अतिरिक्त पोषण मिळत नाही!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.