Rare Pink Dolphin | ओमानच्या समुद्रात गुलाबी डॉल्फिन

Rare Pink Dolphin |
Rare Pink Dolphin | ओमानच्या समुद्रात गुलाबी डॉल्फिन
Published on: 
Updated on: 

लंडन : नजर जाईल तिथपर्यंत निळं पाणी दिसणाऱ्या समुद्रात अचानक गुलाबी रंगाचा डॉल्फिन मासा दिसला तर? आधी हा दृष्टीभ्रम वाटेल; पण पुन्हा पुन्हा पाहिल्यानंतरही तो मासा दिसत असेल, तर नक्कीच काहीतरी गडबड आहे, अशी शंका येईल. असाच काहीसा प्रकार नेटकऱ्यांसोबत होत असला, तरी इंटरनेटवर चर्चेत असलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हा गुलाबी डॉल्फिन ओमानच्या किनारपट्टीवर पाहायला मिळाल्याचं सांगितलं जातंय. ओमानची राजधानी मस्कत येथील कंताब बीचजवळ या दुर्मीळ गुलाबी रंगाच्या डॉल्फिनचं दर्शन झालं आहे. या दुर्मीळ रंगाच्या डॉल्फिनचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वन्यजीवप्रेमी आणि पर्यटक इथं गर्दी करू लागलेत. व्हिडीओ, फोटो व्हायरल झाल्यापासून या अनोख्या समुद्री जिवाबद्दल नेटकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मस्कतमधील कतांब बीचच्या किनाऱ्याजवळील हा गुलाबी रंगाचा डॉल्फिन मासा इतर सामान्य डॉल्फिनसोबत पोहताना दिसला. हा गुलाबी डॉल्फिन समुद्राच्या पृष्ठभागावर येऊन पुन्हा पाण्यात डुबकी मारताना पाहायला मिळाला. ही दृश्ये काही पर्यटकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले.

पाहता पाहता हे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्याने या अनोख्या डॉल्फिनची चर्चा जगभर सुरू झाली आहे. काही विशिष्ट प्रजातींमध्ये वयानुसार डॉल्फिन माशाच्या त्वचेचा रंग बदलून गुलाबी किंवा फिकट पांढरट होऊ शकतो. इंडो – पॅसिफिक हंपबॅक डॉल्फिनमध्येही असा रंग अनेकदा दिसतो. काही माशांमध्ये मात्र अल्बिनिझमसारख्या स्थितीमुळे त्वचेचा रंग बदलू शकतो. मात्र, ओमानमध्ये दिसलेल्या डॉल्फिनच्या गडद गुलाबी रंगांमधील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. काही तज्ज्ञांनी व्हायरल झालेला हा डॉल्फिन रिसो डॉल्फिन किंवा इंडो पॅसिफिक हंपबॅक डॉल्फिन प्रजातीचा असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत वैज्ञानिक पुष्टी झालेली नाही.

logo
Pudhari News
pudhari.news