Dwarf Fox | नामशेष झाल्याची भीती असलेला दुर्मीळ ‘बुटुक कोल्हा’ सापडला!

युकातान बेटावर पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद!
Dwarf Fox |
Dwarf Fox | नामशेष झाल्याची भीती असलेला दुर्मीळ ‘बुटुक कोल्हा’ सापडला!
Published on
Updated on

मेक्सिको सिटी : गेल्या अनेक वर्षांपासून नामशेष झाल्याची भीती व्यक्त केली जात असलेल्या एका अत्यंत दुर्मीळ 'बुटुक कोल्ह्याचा' (Dwarf Fox) शोध घेण्यात वन्यजीव संशोधकांना यश आले आहे. मेक्सिकोच्या युकातान द्वीपकल्पाजवळील एका बेटावर हा अत्यंत लाजाळू आणि दुर्मीळ प्राणी पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या ऐतिहासिक छायाचित्रामुळे वन्यजीव प्रेमी आणि संशोधकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, कॅमेऱ्यात कैद झालेला हा प्राणी दुर्मीळ 'कोझुमेल कोल्हा' (Cozumel Fox) असण्याची दाट शक्यता आहे. हा जगातील सर्वात बुटक्या कोल्ह्यांच्या प्रजातींपैकी एक मानला जातो. यापूर्वी हा प्राणी केवळ मेक्सिकोच्या 'कोझुमेल' बेटावरच आढळत होता. गेल्या कित्येक दशकांत हा कोल्हा कोणालाही प्रत्यक्ष दिसला नव्हता, ज्यामुळे ही प्रजाती कायमची नष्ट झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात होता. या बुटुक कोल्ह्याचे वास्तव्य अत्यंत दुर्गम भागात आणि मानवी वस्तीपासून दूर राहिले आहे. अतिशय लाजाळू स्वभावाचा असल्यामुळे त्याला शोधणे कठीण होते. मात्र, युकातान बेटावर लावण्यात आलेल्या विशेष 'कॅमेरा ट्रॅप'च्या माध्यमातून या कोल्ह्याचे स्पष्ट फोटो काढण्यात संशोधकांना पहिल्यांदाच यश आले आहे.

संशोधकांच्या मते, या बेटांवर मानवी हस्तक्षेप वाढल्याने आणि पाळीव कुत्र्यांनी आणलेल्या विविध रोगांच्या संसर्गामुळे या कोल्ह्यांची संख्या झपाट्याने घटली होती. त्यातच चक्रीवादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे त्यांच्या अधिवासाचे मोठे नुकसान झाले होते. हा कोल्हा अजूनही जिवंत असल्याचे पुरावे मिळाल्यामुळे आता या बेटावरील जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी तातडीने पावले उचलली जात आहेत. हा कोल्हा कोझुमेल फॉक्सचीच स्वतंत्र प्रजाती आहे की 'ग्रे फॉक्स' या प्रजातीचा उपप्रकार आहे, याचा अधिक अभ्यास आता संशोधक करत आहेत. या शोधामुळे या दुर्मीळ प्राण्याला नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी एक नवीन आशेचा किरण निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news