Ramappa Temple | पाण्यावर तरंगणाऱ्या विटांचे ‘रामप्पा मंदिर’

२५ जुलै २०२१ मध्ये झाला होता ‘युनेस्को’च्या यादीत समावेश!
 Ramappa Temple |
Ramappa Temple | पाण्यावर तरंगणाऱ्या विटांचे ‘रामप्पा मंदिर’
Published on
Updated on

मुलुगु (तेलंगणा) : आधुनिक काळातील नागरी अभियांत्रिकीमध्ये दररोज नवनवीन आणि प्रगत तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. मात्र, प्राचीन भारतातील उत्कृष्ट अभियांत्रिकीच्या पुढे आजचे तंत्रज्ञानही थक्क होते. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी हे सिद्ध केले आहे की भूतकाळातही आपल्याकडे एकाहून एक श्रेष्ठ अभियंते होते. असाच एक अद्वितीय वास्तुशास्त्रीय चमत्कार म्हणजे तेलंगणातील ‘रामप्पा मंदिर’. या मंदिराच्या विटा कारागिरांनी इतक्या कौशल्याने आणि प्रगत तंत्रज्ञानाने बनवल्या आहेत की त्या पाण्यावर तरंगतात!

तेलंगणाच्या मुलुगु जिल्ह्यातील या मंदिराला ‘काकतीय रुद्रेश्वर मंदिर' असेही म्हटले जाते. भगवान रामलिंगेश्वर स्वामींना समर्पित असलेल्या या मंदिरात श्रद्धा आणि विज्ञानाचा असा अद्भुत संगम पाहायला मिळतो, जो आजपर्यंत एक रहस्य बनून राहिला आहे. या मंदिराची निर्मिती १३ व्या शतकात झाली. आंध्र प्रदेशातील काकतीय घराण्याचे महाराज गणपती देव यांच्या काळात, त्यांचे सेनापती रेचारला रुद्र यांच्या देखरेखीखाली हे मंदिर उभारले गेले. राजाने ‘रामप्पा' नावाच्या शिल्पकाराला असे मंदिर बनवण्याचा आदेश दिला होता, जे शतकानुशतके मजबूत आणि टिकून राहील.

सन १२१३ मध्ये सुरू झालेले या मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी तब्बल ४० वर्षे लागली होती. हे मंदिर एका ६ फूट उंच ताऱ्याच्या आकाराच्या प्लॅटफॉर्मवर उभे आहे. मंदिराच्या भिंती, खांब आणि छतावर अत्यंत क्लिष्ट अन् सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते. मंदिराचे मुख्य खांब ग्रॅनाइट दगडांपासून बनवलेले आहेत आणि त्याचे शिखर पिरॅमिड आकाराचे आहे. मंदिराचे विमान (वरचा भाग) सूक्ष्म छिद्रे असलेल्या अत्यंत हलक्या विटांपासून बनवले गेले आहे. मंदिराची खास शैली आणि सजावट पर्यटकांना आकर्षित करतेच; पण पाण्यावर तरंगणाऱ्या विटांमुळे या मंदिराला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळाली आहे. मंदिर प्रामुख्याने वाळूच्या दगडांनी आणि विशेष विटांनी बनवले गेले आहे.

जेव्हा पुरातत्त्व विभागाने या रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मंदिराच्या एका छोट्या तुकड्याची तपासणी करण्यात आली. तो तुकडा वजनाने अत्यंत हलका होता आणि पाण्यात टाकल्यावर सहज तरंगू लागला. सेंद्रिय पदार्थ आणि विशेष माती मिसळून तयार केलेल्या या विटांच्या तंत्रज्ञानामुळे मंदिराच्या पायावर वरच्या शिखराचा अतिरिक्त भार पडत नाही. याच अद्वितीय वैशिष्ट्याची आणि वास्तुकलेची दखल घेत २५ जुलै २०२१ रोजी या मंदिराला ‘युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. काकतीय काळातील मूर्तिकार आणि अभियंत्यांच्या अद्भुत कौशल्याचे हे मंदिर आजही एक जिवंत प्रतीक मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news