‘हेल प्लॅनेट’वर इंद्रधनुष्य?

‘हेल प्लॅनेट’वर इंद्रधनुष्य?

वॉशिंग्टनः इंद्रधनुष्य ही घटना आतापर्यंत केवळ आपल्याच सौरमालिकेत पाहायला मिळालेली आहे. आता प्रथमच ती सौरमालिकेबाहेरील एखाद्या ग्रहावर पाहायला मिळाल्याचे दिसून येत आहे. 'वास्प-76 बी' नावाच्या एका बाह्यग्रहावर दिसलेला वेगळा, रंगीबेरंगी प्रकाश म्हणजे इंद्रधनुष्यच असावे, असे खगोलशास्त्रज्ञांना वाटते. या ग्रहाला 'हेल प्लॅनेट' असेही म्हटले जाते.

एखाद्या दूरस्थ बाह्यग्रहावर इंद्रधनुष्य दिसणे, ही एक अत्यंत दुर्मीळ घटना आहे. जर हे इंद्रधनुष्यच असल्याची पुष्टी झाली, तर आपल्या सौरमालिकेबाहेर प्रथमच इंद्रधनुष्य पाहिल्याच्या घटनेची नोंद होईल. हा ग्रह पृथ्वीपासून 637 प्रकाशवर्ष दूर अंतरावर आहे. 'वास्प' म्हणजेच 'वाईड अँगल सर्च फॉर प्लॅनेटस्' प्रोजेक्टमध्ये 2013 साली या ग्रहाचा शोध लावण्यात आला होता.

आपल्या सौरमालिकेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरूच्या तुलनेत त्याचे वस्तुमान 90 टक्के आहे व रुंदी सुमारे दुप्पट आहे. तो आपल्या तार्‍याच्या अतिशय जवळच्या अंतरावर आहे. बुध सूर्याच्या जितक्या जवळ आहे त्यापेक्षा वीस पट अधिक जवळ हा ग्रह आहे. तो आपल्या तार्‍याभोवतीची एक प्रदक्षिणा केवळ 1.8 दिवसांमध्ये पूर्ण करतो. याचा अर्थ या ग्रहावरील वर्ष 1.8 दिवसांचे असते! अर्थातच त्याच्यावरील तापमान मोठे असते व ते 2400 अंश सेल्सिअसपर्यंत जाते! त्यामुळेच त्याला 'नरका'ची उपमा देण्यात येते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news