Miss Universe 2026 | प्युर्तो रिकोची जेनिफर बॅरेटो बनली ‘मिस युनिव्हर्स २०२६’

पहिल्यांदाच विवाहित आणि अपत्य असलेल्या सुंदरीला मिळाला किताब
Miss Universe 2026 |
Miss Universe 2026 | प्युर्तो रिकोची जेनिफर बॅरेटो बनली ‘मिस युनिव्हर्स २०२६’
Published on: 
Updated on: 

सॅन जुआन : प्युर्तो रिकोच्या जेनिफर बॅरेटो हीने ‘मिस युनिव्हर्स २०२६’ हा किताब पटकावला आहे. विशेष म्हणजे हा किताब पटकावणारी ती पहिलीच अशी स्त्री आहे जी विवाहित असून, एका अपत्याची आईही आहे! ‘मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन’ने आपले नियम बदलून स्पर्धेत विवाहित आणि आई बनलेल्या स्त्रियांनाही समाविष्ट करून घेण्याचे ठरवल्यानंतर जेनिफरने हा नवा इतिहास घडवला आहे. हा भव्य सोहळा प्युर्तो रिकोतीलच सॅन जुआन येथे पार पडला. त्यामुळे आपल्या मायभूमीत आणि आपल्या माणसांसमोर हा मुकुट परिधान करणे जेनिफरसाठी अत्यंत संस्मरणीय आणि भावूक क्षण ठरला.

सॅन जुआन येथील प्रसिद्ध ‘कोलिसिओ दे प्युर्तो रिको जोस मिगुएल ॲग्रेलोट’ येथे झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात प्युर्तो रिकोने सहाव्यांदा या किताबावर नाव कोरले. जेनिफरने मेक्सिकोची गतवर्षीची विश्वसुंदरी फातिमा बॉश हीच्या हस्ते हा ३१५० हिरे जडवलेला मुकुट स्वीकारला. या स्पर्धेत डॉमिनिकन रिपब्लिकची मेलिसा नुनेझ ‘फर्स्ट रनर-अप’ठरली, तर व्हेनेझुएलाच्या क्लारा वेगास गोएत्झने दुसरे स्थान पटकावले. त्यांच्यासोबत फिलिपिन्स आणि न्यूझीलंडच्या अंतिम स्पर्धकांनी चुरशीच्या ‘टॉप ५’ मध्ये स्थान मिळवले. दरम्यान, भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काझिया लिझ मेजो हिने ‘टॉप ३०’ मध्ये स्थान मिळवले होते; मात्र तिला ‘टॉप १२’ मध्ये प्रवेश करता आला नाही. ‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२६’ चा मुकुट पटकावणारी मेजो ही केरळमधील पहिलीच महिला ठरली होती.

२७ वर्षीय जेनिफर बॅरेटो हीने जगभरातून आलेल्या ११५ स्पर्धकांवर मात करत हा मानाचा किताब जिंकला. ती सात वर्षांच्या पेनेलोप नावाच्या मुलीची आई आहे. तिचा पती यान कार्लोस बॅरेटो हा अमेरिकन सैन्यात सार्जंट आहे. तिला या संपूर्ण स्पर्धेत एकापेक्षा एक कठीण फेऱ्या पार पाडाव्या लागल्या; मात्र जेनिफरने प्रत्येक आव्हान सहजतेने पेलत आधी ‘टॉप ५’ मध्ये स्थान पक्के केले. त्यानंतर अंतिम फेरीतही तिने आपला प्रभाव कायम ठेवत अखेर विजेतेपदावर मोहोर उमटवली आणि सर्वांची मने जिंकली. तिच्या या मोठ्या विजयामुळे आंतरराष्ट्रीय मंचावरील प्युर्तो रिकोचा जुना आणि भक्कम विक्रम अधिकच बळकट झाला आहे. यापूर्वीही या देशातील अनेक सौंदर्यवतींनी ही कामगिरी केली आहे.

१९७० मध्ये मारिसोल मलारेट, १९८५ मध्ये डेबोरा कार्थी-ड्यू, १९९३ मध्ये दयानारा टोरेस, २००१ मध्ये डेनिस क्विनोन्स आणि २००६ मध्ये जुलेका रिवेरा यांनी हा मुकुट जिंकून देशाची मान उंचावली होती. आता जेनिफरनेही या विशेष यादीत आपले नाव जोडून इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. सॅन सेबॅस्टियन शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जेनिफरने यंदाच्याच जून महिन्यात ‘मिस युनिव्हर्स प्युर्टो रिको २०२६’ चा किताब जिंकला होता. सर्वसाधारणपणे या मोठ्या मंचावर येणाऱ्या स्पर्धकांकडे मॉडेलिंगचा अनेक वर्षांचा अनुभव असतो; परंतु जेनिफर या क्षेत्रात अगदी नवखी होती. तिने फेब्रुवारी २०२६ मध्येच पहिल्यांदा रॅम्पवर पाऊल ठेवले होते. तिच्या शैक्षणिक कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिच्याकडे मानसशास्त्र विषयातील पदवीसोबतच मानसशास्त्र आणि समाजकार्याची पदव्युत्तर पदवी आहे. तिचे आधीचे कार्य नेहमीच समाजहिताशी आणि सर्वसामान्यांच्या मदतीशी जोडलेले राहिले आहे. मिस युनिव्हर्स होण्यापूर्वी जेनिफरने अमेरिकेच्या ‘डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स’मध्ये ‘प्रिव्हेंशन स्पेशलिस्ट’ म्हणून काम केले आहे. या काळात तिने घरगुती हिंसाचार आणि बालकांचे शोषण यांसारख्या गंभीर समस्यांनी पीडित झालेल्या लष्करी कुटुंबांना आधार दिला.

२० वर्षांची प्रतीक्षा संपली!

जेनिफर बॅरेटोच्या या विजयाने प्युर्तो रिकोवासीयांची तब्बल २० वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. देशातील जनता या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती आणि आता सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. यापूर्वी प्युर्तो रिकोच्या शेवटच्या ‘मिस युनिव्हर्स’ विजेत्या जुलेका रिवेरा ठरल्या होत्या, ज्यांनी २००६ मध्ये हा किताब जिंकला होता. जवळपास दोन दशकांच्या दीर्घ कालावधीनंतर ‘मिस युनिव्हर्स’चा मुकुट पुन्हा मायदेशी परतल्याने संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली असून, नागरिक रस्त्यावर उतरून या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करत आहेत. हा वारसा जपणाऱ्या जेनिफर बॅरेटोचे नाव सर्वत्र घुमत आहे.

विजेतेपदाचा मुकुट देणारे उत्तर

यंदाच्या अंतिम फेरीत सर्वच स्पर्धकांना एक प्रश्न विचारण्यात आला होता : ‘‘सध्याच्या काळात जगाला आपल्या नेत्यांकडून सर्वात जास्त कशाची गरज आहे?’’ यावर जेनिफर बॅरेटोने दिलेल्या नेमक्या आणि प्रभावी उत्तराने तिला विजेतेपदाचा मुकुट मिळवून दिला. ती म्हणाली, ‘‘मला वाटते की जगाला अशा नेत्यांची गरज आहे, जे व्यावसायिकदृष्ट्या संवेदनशील आणि सहानुभूतीशील (प्रोफेशनली एम्पॅथेटिक) असतील. आपण अशा जगात राहतो जिथे आपण अनेकदा इतरांचे परीक्षण करतो आणि त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो; परंतु एका नेत्याने आपल्या मूल्यांसाठी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, स्वतःचा आदर्श निर्माण केला पाहिजे आणि यशाचा व नैतिकतेचा दर्जा उंचावला पाहिजे.’’ तिला ‘आपण कधीही गमावता कामा नये असे सर्वात महत्त्वाचे मानवी मूल्य कोणते आहे?’ हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने उत्तर दिले, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (कृत्रिम बुद्धिमत्ता) आता कायमस्वरूपी आपल्या आयुष्यात आले आहे आणि मला वाटते की सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याचा काळजीपूर्वक वापर करणे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस जसजसे प्रगत होत जाईल, तसतशी ती आपल्या मूल्यांची परीक्षा घेत आहे. ते मूल्य म्हणजे आपल्या बोलण्यातील आणि वागण्यातील सुसंगती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.