प्राचीन इजिप्त, ग्रीसमध्येही होत असत मानसोपचार

प्राचीन इजिप्त, ग्रीसमध्येही होत असत मानसोपचार
Published on
Updated on

कैरो : आपण शारीरिक आरोग्याकडे जितके गांभीर्याने लक्ष देत असतो, तितके मानसिक आरोग्याकडे देत नाही. सुदैवाने आता त्याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. मानसिक आजारांवर सध्या अनेक चांगली औषधे व उपचार पद्धतीही आलेल्या आहेत ज्याचा मानसिकद़ृष्ट्या त्रस्त असलेल्या रुग्णांना चांगला लाभही मिळत असतो. अर्थात मानसोपचार ही काही आधुनिक काळातीलच बाब आहे असे नाही. प्राचीन इजिप्त व ग्रीसमध्येही मानसोपचार होत असत. इजिप्तमध्ये त्यासाठी अनेक 'स्लीप टेम्पल'ही बनवण्यात आले होते. ग्रीसमध्येही अशाच प्रार्थनास्थळी निसर्गाच्या सान्निध्यात तत्कालीन पद्धतीप्रमाणे उपचार केले जात होते.

चार हजार वर्षांपूर्वी इजिप्तच्या लोकांनी 'स्लीप टेम्पल्स' बनवले होते. त्यांचा वापर पूजाअर्चेशिवाय मानसिक-शारीरिक त्रासांपासून दूर राहण्यासाठी केला जात असे. पूजारी रुग्णांना अर्धचेतनेच्या अवस्थेत नेऊन त्यांच्या स्वप्नांचा अर्थ लावत असत. तसेच त्यांना चांगले जीवन जगण्यासाठी काही सल्लेही देत. चिंतीत व दुःखी लोकांना संगीत, पेंटिंग व निसर्गाच्या सान्निध्यात राहून बरे होण्यासाठी मदत केली जात असे. प्राचीन काळात अर्थातच वैज्ञानिक उपचार पद्धती अस्तित्वात नव्हती.

त्यावेळी तंत्र-मंत्राची मदत घेतली जात असे. काही तांत्रिक, पुजारी वेगवेगळे उपाय करून उपचार करण्याचा प्रयत्न करीत. मनोचिकित्सा ही चिकित्सा विज्ञानातील सर्वात पुरातन शाखा मानली जाते. प्राचीन काळी त्याचा संबंध धर्म, जादू, मंत्र-तंत्र आणि पारलौकिक शक्तींशी अधिक जोडला जात असे. ग्रीसमध्येही प्राचीन काळात मानसोपचार होत असत.

चिकित्सा आणि उपचाराची ग्रीस देवता 'एस्क्लेपियस'चे अनेक उपासक होते. विविध वनौषधी आणि स्वप्नांच्या विश्लेषणातून ते उपचार करीत. इसवी सनपूर्व चौथ्या शतकात एपिडॉरसमध्ये एस्क्लेपियसच्या प्रार्थनास्थळी असे उपचार केले जात असत. ही ठिकाणे शहरांपासून दूर निर्जन अशा डोंगरांवर असत. शुद्ध हवा, साधा आहार, झर्‍याचे ताजे पाणी यांचा रुग्णांना लाभ दिला जात असे. कला शिकण्यासाठी थिएटर आणि वाचण्यासाठी ग्रंथालयही होते. दुसर्‍या महायुद्धाच्या काळानंतर मानसोपचारावर काही चांगली, प्रभावी औषधे आली. अजूनही मानसोपचारावर अधिकाधिक प्रभावी उपचार व औषधांसाठी नवे संशोधन होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news