

कोपेनहेगनः डेन्मार्कची राजकुमारी इसाबेला हिने अवघ्या १९ व्या वर्षी सैन्यात भरती होऊन एक नवा इतिहास रचला आहे. प्रिन्सेस इसाबेलाने ११ महिन्यांचे अनिवार्य लष्करी प्रशिक्षण सुरू केले आहे. यासह संपूर्ण अनिवार्य लष्करी प्रशिक्षणात भाग घेण्याचा निर्णय घेणारी ती डेन्मार्कच्या शाही घराण्यातील पहिली महिला ठरली आहे. नुकतेच प्रिन्सेस इसाबेलाने स्लागेल्से शहरातील ‘एंटव्होर्सकोव्ह बॅरक’ येथे रिपोर्ट केले. डेन्मार्कच्या राजघराण्याच्या इतिहासात हा अत्यंत महत्त्वाचा क्षण मानला जात आहे.
राजा फ्रेडरिक आणि राणी मॅरी यांची मोठी मुलगी असलेल्या इसाबेलाने हायस्कूलचे (उच्च माध्यमिक) म्हणजेच आपल्याकडील बारावीचे शिक्षण पूर्ण केल्याच्या काही आठवड्यांतच ‘गार्ड हुसार रेजिमेंट’ जॉईन केली. उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी ती स्वतः काळी एसयूव्ही कार चालवत बरॅकवर पोहोचली. जीन्स आणि जॅकेट परिधान केलेली इसाबेला एक मोठी बॅग आणि छोटा पर्स घेऊन आली होती. प्रवेशद्वारावर तिने कर्तव्यावर असलेल्या रक्षकाला आपले ओळखपत्र (आईडी कार्ड) दाखवले. तेथे उपस्थित पत्रकार आणि फोटोग्राफर्सना अभिवादन करून ती बरॅकच्या आत निघून गेली. इसाबेला तिचा मोठा भाऊ ‘क्राऊन प्रिन्स ख्रिश्चन’ याच्या पावलावर पाऊल ठेवत आहे.
ख्रिश्चननेदेखील याच बरॅकमध्ये आपले लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले असून, तो सध्या ‘सेकंड लेफ्टनंट’ बनण्याचे प्रशिक्षण घेत आहे. मात्र, राजघराण्यातील कोणत्याही महिलेने देशाच्या विस्तारित लष्करी सेवा योजनेंतर्गत सक्रिय सेवा सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे. डेन्मार्कमधील वर्तमानपत्रांनुसार, इतर सैनिकांप्रमाणे राजकुमारी इसाबेला लष्करी सेवेदरम्यान मिळणारा पगार किंवा दैनंदिन भत्ता घेणार नाही. डेन्मार्कच्या राजघराण्याने स्पष्ट केले की, हा निर्णय इसाबेलाने स्वतः घेतला असून, सेवेदरम्यान होणारा तिचा संपूर्ण खर्च तिचे आई-वडील उचलतील. सामान्यतः डेन्मार्कमध्ये अनिवार्य लष्करी सेवा देणाऱ्या तरुणांना दरमहा पगार आणि करमुक्त दैनंदिन भत्ता दिला जातो. युरोपमधील वाढते सुरक्षेचे आव्हान, युक्रेन युद्ध आणि आर्क्टिक क्षेत्रातील वाढता तणाव पाहता डेन्मार्क आपले सैन्य अधिक मजबूत करत आहे. याअंतर्गत महिलांसाठीही अनिवार्य लष्करी सेवा लागू करण्यात आली असून, सेवेचा कार्यकाळ ४ महिन्यांवरून वाढवून ११ महिने करण्यात आला आहे.