प्रिन्स विल्यमची पत्नी केटला कर्करोग

प्रिन्स विल्यमची पत्नी केटला कर्करोग
Published on
Updated on

लंडन : ब्रिटिश राजघराणे नेहमीच लोकांच्या नजरेत असते. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसत नसल्याने केट मिडल्टन यांच्याबाबत ब्रिटनमध्ये चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या ब्रिटनचे राजपुत्र विल्यम यांच्या पत्नी आहेत. 'व्हेअर इज केट?' असे सोशल मीडियातून आणि वृत्तपत्रांमधूनही विचारले जात होते. याचे कारण म्हणजे जानेवारीत त्यांच्यावर झालेल्या पोटाच्या शस्त्रक्रियेनंतर त्या दिसल्या नव्हत्या आणि त्यांना एखादा गंभीर आजार आहे की काय, अशी शंका लोकांना येत होती. अखेर ही शंका खरीच ठरली आहे. स्वतः प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडल्टन यांनी एका व्हिडीओतून याबाबतची माहिती दिली. आपल्याला कर्करोग झाल्याचे निदान झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी त्यांचे श्वशूर व ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स तृतीय यांनाही कर्करोगाचे निदान झाले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यापाठोपाठ आता केटला अशा आजाराने ग्रासल्याने ब्रिटिश लोकांची चिंता वाढली आहे.

केट यांनी शुक्रवारी यासंदर्भातील माहिती एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली. त्यांच्यावर सध्या केमोथेरपी सुरू आहे. जानेवारी 2024 मध्ये त्यांच्या पोटाची शस्त्रक्रिया झाली होती, त्यावेळी त्या दोन आठवडे रुग्णालयात होत्या. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी त्यांचा वावर कमी झाला होता. आता त्यांनी कॅन्सरचं निदान झाल्याचं सांगितलं आहे. केट यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटलं की, त्यांना कर्करोग झाला आहे. मात्र, कोणता कर्करोग आहे आणि तो कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती त्यांनी दिलेली नाही. शस्त्रक्रियेवेळी आपल्याला कर्करोग असेल असे डॉक्टरांना वाटले नव्हते. मात्र, शस्त्रक्रियेनंतर काही चाचण्या झाल्या. त्यानंतर मला कर्करोग झाल्याचं निदान झालं. माझ्यासाठी आणि विल्यमसाठी ही धक्कादायक बातमी होती.

आता मी ठीक आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केमोथेरपी घेत आहे, असं त्या व्हिडीओमध्ये म्हणाल्या. केट यांना कोणत्या प्रकारचा कर्करोग झाला आहे, याची माहिती देऊ शकत नाही. त्यांना वैद्यकीय गोपनीयतेचा अधिकार आहे, असं केन्सिंग्टन पॅलेसच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे. दरम्यान, कर्करोगाचे निदान झालेल्या केट या राजघराण्यातील तिसर्‍या सदस्य आहेत. याआधी किंग चार्ल्स आणि डचेस ऑफ यॉर्क सारा फर्ग्युसन यांनाही कर्करोगाचं निदान झालं होतं. प्रिन्स विल्यम यांना एकीकडे वडिलांच्या, तर दुसरीकडे पत्नीच्या गंभीर आजाराच्या स्थितीचा सामना करावा लागत असल्याने ब्रिटिश लोक हळहळत आहेत. मात्र, त्याचवेळी आपल्या वेदना लपवून ते इतके दिवस शांतपणे आपले कर्तव्य बजावत असल्याचे त्यांना कौतुकही वाटते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news