

लंडन : ब्रिटनमध्ये सध्या एक गुलाबी कबुतर चर्चेत आले आहे. अनेक लोकांनी हे कबुतर आपल्या घराच्या छतावर दाणे वेचत असताना पाहिले त्याची छायाचित्रेही सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. सामान्य लोकांसह पोलिसही हे अनोखे कबुतर पाहून थक्क झाले. ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी म्हटले आहे की काही अधिकार्यांनीही हे दुर्लभ गुलाबी कबुतर पाहिले. त्यांनी फेसबुक पोस्टमधून याची माहिती दिली.
पोलिसांनी सांगितले की अधिकारी ज्यावेळी दुपारी पायीच गस्त घालण्यासाठी निघाले होते त्यावेळी त्यांना शहरात हे दुर्लभ गुलाबी कबुतर दिसले. पोस्टमध्ये पोलिसांनी लोकांनाही 'तुम्ही हे कबुतर पाहिले का?' असा प्रश्नही विचारला. एका वृत्तानुसार अनेक लोकांना संशय आहे की या कबुतराला कुणीतरी रंगवलेले आहे. मात्र, अनेक लोकांना कबुतराचा हा रंग नैसर्गिकच असल्याचे वाटते.
समांथा नावाच्या एका महिलेने सांगितले की एका माणसाने या कबुतराला काही खाण्यास दिले. त्याचा रंग पाहून अनेक लोक थक्क होत होते. त्याचा काही रंग जमिनीवर लागल्यासारखे दिसत होते. त्यामुळे कदाचित त्याला कुणीतरी रंगवले असावे असे वाटते! यापूर्वी अमेरिकेतही असाच प्रकार घडला होता. तिथे न्यूयॉर्क शहरात एका गुलाबी कबुतराची सुटका करण्यात आली होती. त्यालाही एका पार्टीसाठी कुणीतरी गुलाबी रंगात रंगवले होते.