

लंडन : जागतिक स्तरावर प्लास्टिकच्या वाढत्या उत्पादनामुळे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तोडगा काढण्यात आलेल्या अपयशामुळे जमीन व सागरी पर्यावरणातील प्लास्टिक प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. 2022 मध्ये जगभरातील प्लास्टिकचे वार्षिक उत्पादन 400 दशलक्ष मेट्रिक टनपर्यंत वाढले असून, 2050 पर्यंत ते दुप्पट होण्याची शक्यता आहे. यातील अनेक वस्तू एकल-वापर (सिंगल यूज) प्रकारातील असतात आणि प्लास्टिक कचर्यापैकी 10 टक्क्यांपेक्षाही कमी कचर्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते.
ऑगस्ट 2025 मध्ये, संयुक्त राष्ट्र सदस्य राष्ट्रांमधील 2,600 हून अधिक प्रतिनिधींनी प्लास्टिक प्रदूषण संपवण्याच्या करारावर वाटाघाटी करण्यासाठी पाचव्यांदा एकत्र जमले होते. मात्र, बंधनकारक उपाययोजना असाव्यात की स्वैच्छिक उपाययोजना, या मूलभूत मुद्द्यांवर एकमत न झाल्याने ही चर्चा निष्फळ ठरली. तेल आणि प्लास्टिक उत्पादनामध्ये विशेष हितसंबंध असलेल्या राष्ट्रांनी ‘समान-विचारांचा गट’ तयार केला आहे. या गटाचा आग्रह आहे की हा करार केवळ प्लास्टिकचे पुनर्वापर आणि उपभोग यापुरता मर्यादित असावा आणि उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यास त्यांनी विरोध केला आहे. नदीमध्ये तरंगणार्या प्लास्टिकच्या ढिगार्यामुळे पाणी दिसत नाही, समुद्रकिनार्यांवर प्लास्टिकच्या कचर्याचे ढिगारे साचले आहेत, रस्त्याकडील वनस्पतींना प्लास्टिकच्या पिशव्या लटकलेल्या दिसतात.
हे विद्रूप द़ृश्य काहीतरी करण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे दर्शवते. परंतु, ही विद्रूपता प्लास्टिक प्रदूषणाच्या अनेक समस्यांपैकी सर्वात लहान आहे. ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीच्या तटीय ओरेगॉन मरीन प्रयोग केंद्रातील सहयोगी प्राध्यापिका सुसान ब्रॅंडर सांगतात की, कच्च्या मालाच्या निष्कर्षणपासून ते वस्तूच्या अखेरपर्यंत प्लास्टिकच्या जीवनचक्रात ही रसायने हेतूपुरस्सर किंवा अनवधानाने मिसळली जातात. ‘एका प्लास्टिकच्या वस्तूत किती रसायने असतील याचा अंदाज लावणे शक्य नाही,’ त्या म्हणतात, ‘महत्त्वाची गोष्ट म्हणजे, एकही प्लास्टिकचा प्रकार सुरक्षित नाही. सर्व प्रकारांमध्ये ही संभाव्य समस्याजनक रसायनांची मिश्रणे आहेत.’ केवळ 6 टक्के प्लास्टिक रसायनांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नियमन केले जाते, तर सुमारे 1,000 रसायने राष्ट्रीय नियमांनुसार नियंत्रित केली जातात.
जुलै 2025 मध्ये ‘नेचर’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधानुसार, शास्त्रज्ञांनी 16,325 ज्ञात प्लास्टिक रसायनांची यादी सादर केली आणि त्यापैकी 4,200 हून अधिक रसायने चिंताजनक म्हणून ओळखली आहेत. याचा अर्थ ही रसायने विषारी आहेत, पर्यावरणात नैसर्गिकरीत्या विघटित होत नाहीत किंवा सजीवांमध्ये जमा होतात.प्लास्टिकच्या संपूर्ण चक्रात ही रसायने बाहेर पडतात, ज्यामुळे लोक आणि पर्यावरणाला सतत धोका असतो आणि त्याचे गंभीर परिणाम होतात.
एकदा पर्यावरणात गेल्यावर, प्लास्टिकचे भौतिकरीत्या लहान कणांमध्ये विघटन होते. 5 मिलिमीटरपेक्षा लहान असलेल्या या कणांना मायक्रोप्लास्टिक्स म्हणतात. हे कण सागरी आणि किनारी वातावरणात प्रदूषणाचे एक प्रमुख रूप आहेत. मायक्रोप्लास्टिक्सच्या पृष्ठभागावर विषारी आणि अंतःस्रावी-व्यत्यय आणणारे रासायनिक पदार्थ शोषले जातात. समुद्री पक्षी आणि प्लँक्टन खाणारे जीव (उदा. मासे आणि प्रवाळ) हे मायक्रोप्लास्टिक्स खातात आणि हे रसायन अन्नसाखळीत प्रवेश करतात. अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मायक्रोप्लास्टिक्स मानवी अवयव आणि ऊतींमध्ये देखील आढळले आहेत, ज्यामुळे पेशींचे वय वाढणे, जनुकीय अभिव्यक्ती बदलणे, ऑक्सिडेटिव्ह ताण वाढणे आणि सूज यांसारखे परिणाम दिसून येतात.