

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील रहिवाशी असलेल्या दशरथ जाधव यांनी इंग्लडच्या भूमीत वयाच्या ६६ व्या वर्षी अतिकठीण समजली जाणारी सायकल स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. या वयात ही स्पर्धा पूर्ण करणारे ते एकमेव भारतीय सायकलपटू ठरले आहेत. डोर्लेवाडी येथील सुपुत्र व पुण्याचे उद्योजक दशरथ दिनकर जाधव यांनी लंडन (इंग्लंड) आणि एडीनबर्ग (स्कॉटलंड) या दोन कॅपिटल शहरांमध्ये होणारी जगातील सर्वात अवघड समजली जाणारी १५२० किमी (९३० मैल) सायकल स्पर्धा १२५ तास ३३ मिनिटे या विक्रमी वेळेत पूर्ण करत इतिहास रचला आहे.
लंडन-एडिनबर्ग-लंडन ही १५४० किलोमीटरची अत्यंत कठीण अशी सायकल स्पर्धा समजली जाते. १२८ तासात ती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट स्पर्धकांपुढे असते. यामध्ये २० कंट्रोल पाॅईंटस असतात. दोन कंट्रोल पाॅईंटससमधील अंतर कोणत्याही सोयी किंवा मदतीशिवाय तेही ठराविक वेळेत पूर्ण करायचे असते. स्पर्धा सुरु असताना छोटी चूक झाली तरी स्पर्धकाला बाद ठरवले जाते. त्यामुळे त्यात स्पर्धकाचा शारीरिक तसेच मानसिक कस लागतो.
समतोल साधत ४७ हजार ५६४ फूट चढ आणि ४७ हजार ५६३ फूट उतार असलेल्या, डोंगराळ रस्त्यावरून ऊन, वारा, पाऊस असतानादेखील ही स्पर्धा पूर्ण करण्याचे मोठे आव्हान स्पर्धकांपुढे असते. परंतु ६६ वर्षीय जाधव यांनी १२५ तासातच ती पूर्ण करत अनोखा विक्रम नोंदवला.
या स्पर्धेत १२० भारतीय सायकलपटूंनी सहभाग घेतला होता. त्यातील ४७ जणांनी स्पर्धा पूर्ण केली. जाधव यांनी यापूर्वी वयाच्या ६० व्या वर्षी आयर्नमॅन किताब पटकावला होता. त्यानंतर सलग सातवेळा त्यांनी आयर्नमॅन स्पर्धेवर आपली मोहोर उमटवली. सातदा हा किताब पटकावणारे ते देशातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहेत.