

मॉस्को : भारताच्या 'चांद्रयान-3' बरोबरच रशियाचीही 'लूना-25' ही चांद्रमोहीम सुरू झालेली आहे. 'लूना-25' हे रशियन यानही आता चंद्राच्या कक्षेत जाऊन पोहोचले आहे. तेथून त्याने चंद्राच्या पृष्ठभागाचे पहिले छायाचित्रही पाठवले आहे. त्यामध्ये चंद्रावरील एक मोठा खड्डाही दिसून येतो.
'चांद्रयान-3' पाठोपाठ सुमारे महिनाभराने रवाना झालेले 'लूना-25' ही आता चंद्राच्या कक्षेत भ्रमण करीत आहे. 11 ऑगस्टला हे यान लाँच करण्यात आले होते. रशियन अंतराळ संस्था 'रॉसकॉसमॉस'ने या यानाने टिपलेले चंद्राचे छायाचित्र आपल्या टेलिग्राम चॅनेलवर एका पोस्टसह शेअर केले आहे. एजन्सीने म्हटले आहे की सुमारे पाच दिवस हे यान चंद्राभोवती फिरत राहील. त्यानंतर 21 ऑगस्टला ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी आपला मार्ग बदलेल.
दोन दिवसांनी म्हणजेच 23 ऑगस्टला ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होईल. भारताचे 'चांद्रयान-3' मधील विक्रम लँडरही याच दिवशी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. 'रॉसकॉसमॉस'ने म्हटले आहे की 'लूना-25' च्या लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाचे पहिले तपशीलवार छायाचित्र टिपले आहे. ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील 'जीमन' नावाच्या क्रेटर म्हणजेच विवराचे आहे. हा खड्डा 75 अंश दक्षिण अक्षांश आणि 135 अंश पश्चिम रेखांशावर आहे.
सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर व सुमारे 50 वर्षांच्या काळातील ही रशियाची पहिली चांद्रमोहीम आहे. यापूर्वी 13 ऑगस्टलाही 'लूना-25' ने काही छायाचित्रे पाठवली होती. त्यामध्ये एका बाजूला पृथ्वी आणि एका बाजूला चंद्र दिसत होता. आता त्याने ज्या खड्ड्याचे छायाचित्र टिपले आहे ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ आहे. तो पृथ्वीवरून दिसत नाही. 'जीमन'च्या वायव्येला न्यूमेरोव क्रेटर आणि आग्नेयला एशब्रुक क्रेटर आहे.