सॅन्टियागो : 'व्हेन द लक प्लक्स, नो बडी चेक्स,' असे का म्हटले जाते, त्याचा अलीकडेच एका व्यक्तीला चांगलाच प्रत्यय आला. वास्तविक, तो नेहमीप्रमाणे घराची साफसफाई करत होता… अन् याचवेळी त्याच्या हाती असा खजिना लागला की, त्यामुळे तो रातोरात कोट्यधीश झाला.
चिलीतील या व्यक्तीला कपाट ठीकठाक करत असताना आपल्या वडिलांचे चक्क 60 वर्षांपूर्वीचे पासबुक मिळाले आणि या पासबुकामुळेच तो कोट्यधीशही झाला. एक्सेकिल हिनोजोसा असे या व्यक्तीचे नाव आहे. कपाट स्वच्छ करताना वडिलांचे असे पासबुक त्याला मिळाले, ज्या खात्याची त्याला किंचितही कल्पना नव्हती. त्याच्या वडिलांचे 10 वर्षांपूर्वी निधन झाले होते.
एक्सेकिलच्या वडिलांनी 1960-70 च्या दशकात घर खरेदी करण्यासाठी बँकेत 163 डॉलर म्हणजे साधारणपणे 13480 रुपये बँक खात्यात जमा केले होते. आज ही रक्कम अतिशय तोकडी वाटेल. पण, त्यावेळी त्याचे मोल खूपच होते. अर्थात, ज्या बँकेचे पासबुक होते; त्याची चौकशी केली असता, ती बँक बंद झाल्याचे त्याला कळाले. पण, बँक पैसे देऊ शकत नसेल तर त्याचे पैसे सरकारकडून मिळतात, हे कळाल्यानंतर त्याने त्याप्रमाणे सरकारशी संपर्क साधला.
प्रशासनाने प्रारंभी याला नकार दिला. मात्र, पासबुकसारखा भक्कम पुरावा हाती असल्याने त्याने न्यायालयात दाद मागितली आणि त्याच्या बाजूने निकाल देण्यात आला. कोर्टाने सरकारला व्याज व महागाई भत्त्यासह कोटीच्या घरात भरपाई देण्याचे आदेश दिले अन् यामुळे तो रातोरात कोट्यधीशही झाला!