

कॅलिफोर्निया : काहीवेळा असे अनेक आजार होतात की त्यांचे योग्य निदान होत नाही. यामुळे अशा आजारांवर योग्य उपचारही होत नाहीत. काहीवेळा उपचार तर सुरू केले जातात, पण आजाराचे निदान उशीरा होते. यामुळे केलेले उपचार व्यर्थ ठरतात. यामध्ये मानसिक आजारांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. या आजाराचे सुरुवातीला कोणतेच निदान होत नाहीत.
घाबरणे हासुद्धा एक मानसिक आजारच आहे. संशोधकांनी आपल्या एका अनोख्या संशोधनातून घाबरण्यासंबंधीच्या आजाराचे निदान करण्यासाठी एक ब्लड टेस्ट विकसित केली आहे. म्हणजेच केवळ एका रक्त चाचणीतून घाबरण्यासंबंधीच्या आजाराचे निदान होऊ शकणार आहे. दरम्यान, डिप्रेशन, पाईपोलर डिसऑर्डर यासारख्या मानसिक आजारांचे निदान करण्यासाठी यापूर्वीच रक्त चाचण्या विकसित करण्यात आल्या आहेत.
घाबरण्यासंबंधीची रक्त चाचणी ही बायोमेकरच्या आधारावर अवलंबून आहे. या रक्त चाचणीच्या माध्यमातून संबंधित रुग्णावर योग्यवेळी योग्य उपचार करण्यास मदत मिळणार आहे. बायोमेकर रक्त चाचणीच्या मदतीने भविष्यात संबंधित रुग्ण हा जास्त घाबरण्याचा आजाराचा शिकार ठरू शकतो का? याचेही निदान करता येणे शक्य आहे.
इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनने अनेक चाचण्या घेऊन या रक्त चाचणीची पुष्टी केली आहे. न्यूरोसायंटिस्ट अॅलेक्झांडर निक्युलेस्क्यू यांनी सांगितले की, सध्या जगभरात असंख्य लोक घाबरण्यासंबंधीच्या आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर नव्या रक्त चाचणीच्या मदतीने उपचार करणे शक्य होणार आहे.