दोन्ही हातांनी व दोन्ही पायांनी एकाचवेळी पेंटिंग!

दोन्ही हातांनी व दोन्ही पायांनी एकाचवेळी पेंटिंग!

लंडन : काही माणसांचे अफलातून कौशल्य पाहिलं की निसर्गाने आपल्याच नियमांना असे सज्जड अपवाद निर्माण करून ठेवले आहेत की काय, असे वाटते. दोन्ही हातांनी उलट्या क्रमाने लिहित जाणारे जसे आहेत तसेच दोन्ही हातांनी एकाच वेळी पेंटिंग करणारेही आहेत. मात्र, नेदरलँड्समधील एक तरुणी या सर्वांपेक्षा सरस आहे. ती एकाच वेळी दोन्ही हातांनी व दोन्ही पायांनी वेगवेगळी चित्रे रंगवत असते. दोन्ही पायांच्या बोटांमध्ये दोन ब्रश आणि दोन्ही हातांच्या बोटांमध्ये दोन ब्रश धरून तिचे हे पेंटिंग एकाच वेळी सुरू असते! एकाच वेळी चार ब्रश चालवत ती वेगाने दहा पेंटिंग बनवू शकते!

राजसेना व्हॅन डॅम असे या तरुणीचे नाव. तिने कॅमेर्‍यासमोर अशा प्रकारे एकाच वेळी एक अंतराळवीर, एक पांडा आणि अन्य आठ चित्रे बनवून दाखवली. तिने पाच पेंटिंग टेबलच्या खाली जमिनीवर कागद ठेवून पायाने तर तीन टेबलवर तिच्या समोर ठेवून तसेच दोन खांद्याजवळ असलेल्या स्टँडवरील कागदावर बनवली. तिने पेंटिंगची सुरुवात वेळ घालवण्यासाठी केली होती. एक आव्हान म्हणून तिने एकाचवेळी अनेक ब्रश धरून पेंटिंग करण्यास सुरुवात केली. हळूहळू यामध्ये तिने प्रावीण्य मिळवले आणि आता हा तिचा व्यवसाय बनला आहे.

31 वर्षांच्या या कलाकार महिलेला आता जगप्रसिद्धी मिळालेली आहे. तिने सांगितले, पाच वर्षांपूर्वी मी एक आव्हान म्हणून दोन्ही हातांनी पेंटिंग बनवणे सुरू केले होते. मी एका कॅनव्हासवर थोडे काम करते आणि मग दुसर्‍या कॅनव्हासवर लक्ष देते. याचा अर्थ मी माझे लक्ष दोन्हीकडे विभागून देते. सुरुवातीला मी पायाच्या बोटांमध्ये टेपने ब्रश चिकटवून पेंटिंग करीत होते. त्यानंतर ब्रशला पायाच्या बोटांमध्ये पकडण्यासाठी प्लास्टिसिनचा वापर करण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी ठरला आणि मग पायांनीही पेंटिंग करू लागले. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यावर ऑर्डरचा जणू पूरच आला! मी केलेल्या पेंटिंगमध्ये कोणते पायाने केले आहे व कोणते हाताने हे कुणी सांगू शकत नाही. ते केवळ मीच सांगू शकते, असे तिने आत्मविश्वासाने सांगितले! तिचे पिता जॅको व्हॅन डॅम यांच्या म्हणण्यानुसार तिची पेंटिंग्ज 6 हजार ते 12 हजार युरोंमध्ये विकली जातात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news