

नवी दिल्ली : हंगामी आजारांपासून वाचण्यासाठी हंगामी फळांचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे, यावर नेहमीच भर दिला जातो. सध्या थंडीचा काळ असल्यामुळे या हंगामात येणार्या भाज्या आणि फळे आहारात समाविष्ट करून तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकता, असे आहारतज्ज्ञ सांगतात. हिवाळ्यामध्ये संत्र्याचे सेवन करणे अत्यंत लाभदायक आहे. याला ‘सुपरफूड’ म्हटले जाते, जे शरीराला एक-दोन नव्हे, तर अनेक फायदे देते.
तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्याच्या काळात रोगप्रतिकारकशक्ती अनेकदा कमकुवत होते. यामुळे सर्दी, खोकला, ताप आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत संत्री एक नैसर्गिक ‘इम्यून बूस्टर’ म्हणून काम करते. संत्र्याची चव गोड आणि किंचित आंबट असते. हे जगातील सर्वात पौष्टिक आणि स्वादिष्ट फळांपैकी एक आहे. संत्री हे कमी कॅलरी असलेले फळ असले, तरी ते पोषणतत्त्वांनी परिपूर्ण आहे. यामध्ये ‘क’ जीवनसत्त्वाची मात्रा खूप जास्त असते, जी शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यात मदत करते. यामुळेच डॉक्टर आणि पोषणतज्ज्ञ विशेषतः हिवाळ्यात दररोज संत्रे खाण्याचा सल्ला देतात. संशोधनानुसार, जर एखादी व्यक्ती रोज एक संत्री खात असेल, तर त्याला संपूर्ण दिवसाची 90-100 टक्के ‘क’ जीवनसत्त्वाची गरज पूर्ण होते. संत्र्याचा 86 टक्के भाग पाण्याने बनलेला असतो.
यात फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फोलेट यासारखी अनेक आवश्यक पोषणतत्त्वे आढळतात. हे हंगामी आजारांपासून संरक्षण करण्याचे काम करते. संत्र्यामध्ये लोह नसले, तरी त्यात असलेले ‘क’ जीवनसत्त्व शरीराला लोह शोषून घेण्यास मदत करते. यामुळे हिमोग्लोबिन वाढते आणि अॅनिमियाचा (रक्तक्षय) धोका कमी होतो. संत्र्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंटस् शरीरातील फ्री रॅडिकल्स नष्ट करण्यास मदत करतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. संत्र्यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि ‘बी 6’ जीवनसत्त्व रक्तदाब नियंत्रणात ठेवते.
हे हृदय निरोगी ठेवण्यासही मदत करते. मधुमेह रुग्णांसाठीही संत्रे फायदेशीर आहे; कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि त्यातील फायबर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. संत्रे हाडे मजबूत करण्यासाठी आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते. तसेच, वजन कमी करण्यासाठी ते उपयुक्त आहे; कारण त्यात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. यामुळे पोट जास्त काळ भरलेले वाटते आणि जास्त खाणे टाळले जाते.