न्यूयॉर्क : आर्टिफिशीएल इंटेजिलन्सच्या मुद्द्यावरून जगातील आघाडीच्या कंपन्या असलेल्या मायक्रोसॉफ्ट आणि गुगलच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांमध्ये शाब्दिक टोलवा टोलवी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 'बिंग' या सर्च इंजिनचं एआय पॉवर्ड व्हर्जन लाँच केल्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी आता 'गुगल'ला यामधून प्रेरणा मिळेल अशा अर्थाचं विधान केलं होतं. या दोन्ही कंपन्यांमध्ये स्पर्धा असताना आता या विधानावर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी उत्तर दिलं आहे. सुंदर पिचाई आणि सत्या नाडेला हे दोघेही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन्ही दिग्गज भारतीय वंशाचेच असून सध्या ते एकमेकांच्या आमने-सामने आलेत.
सध्या आर्टिफिशीएल इंटेजिलन्सच्या क्षेत्रात बर्याच घडामोडी घडत आहेत. अनेक कंपन्या आपले प्रोडक्ट या तंत्रज्ञानाला सपोर्ट करणारे असतील याची काळजी घेत आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुगल आणि मायक्रोसॉफ्ट या दोन कंपन्यांमध्येही यावरून स्पर्धा सुरू आहे. दरम्यानच्या काळातच मायक्रोसॉफ्टच्या नेतृत्वाखालील 'बिंग' या सर्च इंजिनचं एआय पॉवर्ड व्हर्जन लाँच झाल्यानंतर याचा गुगलवर काय परिणाम होईल या प्रश्नाचं उत्तर थेट गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनीच दिलं आहे.
आपण यापूर्वी कधीही दिलं नाही एवढ्या कटाक्षाने या तंत्रज्ञानाच्या संदर्भात कंपनीमध्ये लक्ष घालत आहोत, असं सांगितलं. एआयच्या बाबतीत आमची इतरांच्या तालावर नाचण्याची तयारी नसून आम्हीसुद्धा सज्ज असल्याचं पिचाई यांनी अधोरेखित केलं आहे. मला वाटतं यामध्ये तुम्ही चुकण्याचा एक मार्ग म्हणजे बाहेर सुरू असलेल्या गोंगाटाकडे लक्ष देणं आणि इतरांच्या तालावर नाचण्याचा प्रयत्न करणं, असं पिचाई म्हणाले. 'मी याबाबत कायमच स्पष्ट धोरण ठेवलेलं आहे. माझ्या मते आम्हाला नेमकं काय करायचं आहे याची पूर्ण कल्पना आहे,' असंही पिचाई यांनी सांगितलं, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने मार्गक्रमण करत आहात? असा प्रश्न विचारण्यात आला असता पिचाई यांनी, 'होय!
अगदी बरोबर बोललात,' असं उत्तर दिलं. पिचाई यांच्या या विधानाचा थेट संबंध मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी केलेल्या विधानाशी आहे. एआय तंत्रज्ञानाने युक्त बिंग सर्च इंजिन लाँच केल्यानंतर आता कंपन्या एआयच्या आधारावर एकमेकांशी स्पर्धा करत आहेत, असं नाडेला म्हणाले होते. त्यालाच आता पिचाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'आम्ही हे काम पूर्ण केलं आहे. आम्ही आजच्या दिवसापासून सर्चमध्ये स्पर्धा अधिक वाढवली आहे. माझ्यावर विश्वास ठेवा मागील 20 वर्षांपासून मी या क्षेत्रात आहे आणि याच क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत होतो,' असं नाडेला म्हणाले.