

कोलकाता : सध्या संपूर्ण देशात भीषण उन्हाळा सुरू आहे. अनेक ठिकाणी उष्माघाताचे बळी जात आहेत. पारा किती वाढला आहे याचे एक उदाहरण आता पश्चिम बंगालमधून समोर आले आहे. तिथे एका व्यक्तीने उन्हात पॅन ठेवून त्यावर अंडे फोडून टाकल्यावर काही वेळातच त्याचे ऑम्लेट बनले!
याबाबतचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की 46 अंश सेल्सिअस तापमानात छतावर ऑम्लेट कसे बनवायचे? या व्हिडीओवर 41 हजारपेक्षा अधिक रिअॅक्शन्स, 17 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज आणि दीड हजारपेक्षा अधिक कमेंटस् मिळाले आहेत. हा व्हिडीओ चार मिनिटांचा आहे. हा माणूस छतावरील उन्हात एक फ्राईंग पॅन ठेवतो.
थोड्या वेळातच हा पॅन उन्हाने तापतो. त्यावेळी हा माणूस पॅनमध्ये अंडे फोडतो. उन्हाच्या उष्णतेने पॅनमध्ये अंड्याचे ऑम्लेट बनते आणि हा माणूस ते खावूनही दाखवतो. दरवर्षी उन्हाळ्यात असे व्हिडीओ समोर येत असतात. जैसलमेरमधील वाळवंटात पापड भाजून दाखवण्यापासून ते मोटारीच्या बोनेटवर किंवा छतावर अंड्याचे ऑम्लेट बनवणे यासारख्या अनेक व्हिडीओंचा त्यामध्ये समावेश असतो.