Alzheimer's Risk Obesity |लठ्ठपणामुळे वाढू शकतो अल्झायमरचा धोका

Alzheimer's Risk Obesity |
Alzheimer's Risk Obesity |लठ्ठपणामुळे वाढू शकतो अल्झायमरचा धोका
Published on
Updated on

वॉशिंग्टन : लठ्ठपणा केवळ हृदयासाठी किंवा मधुमेहासाठीच नाही, तर आपल्या मेंदूसाठीही अत्यंत घातक ठरू शकतो, असा धक्कादायक खुलासा एका नवीन संशोधनातून झाला आहे. या अभ्यासानुसार, शरीरातील अतिप्रमाणार वाढलेली चरबी थेट मेंदूवर हल्ला करून ‘अल्झायमर’ सारख्या गंभीर आजाराचा धोका वाढवू शकते.

अल्झायमर हा मेंदूशी संबंधित एक गंभीर आजार असून, मेंदूचे कार्य कमकुवत झाल्यामुळे रुग्णामध्ये ‘डिमेंशिया’ म्हणजेच स्मृतिभ्रंशाचा (विस्मरणाचा) धोका वाढतो. ‘मॉलिक्युलर न्यूरोडीजनरेशन’ या प्रसिद्ध जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. या अभ्यासाचे प्रमुख वैज्ञानिक डॉ. स्टीफन वोंग आणि डॉ. ली यांग यांच्या मते, लठ्ठपणा अल्झायमरचा आजार वाढवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. संशोधनात असे दिसून आले आहे की, लठ्ठपणामुळे शरीरातील फॅट टिश्यूजमध्ये (चरबीच्या पेशींमध्ये) काही नकारात्मक बदल होतात, ज्याचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यावर होतो. शरीरात जमा झालेली चरबी आणि त्यातील सूक्ष्म कण मेंदूपर्यंत पोहोचतात आणि अल्झायमरची प्रक्रिया वेगवान करतात. संशोधकाांनी चरबीमध्ये ‘फॉस्फेटिडायलेथॅनोलामाईन्स’ (Phosphatidylethanolamines - PEs) नावाच्या फॅट मॉलिक्युलची (चरबीचा कण) ओळख पटवली आहे. वास्तविक पाहता हा कण अल्झायमरचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त असतो, मात्र लठ्ठपणामुळे शरीरातील "PEs'ची पातळी कमालीची वाढते. ही वाढलेली पातळी सूक्ष्म कणांच्या रूपात मेंदूपर्यंत पोहोचते आणि मेंदूचे मोठे नुकसान करते.

यामुळे मेंदूची रोगप्रतिकारक संरक्षण यंत्रणा (Immune Defense System) कमकुवत होते. मेंदूमध्ये ‘अ‍ॅमिल्लॉईड प्रोटीन’ जमा होऊ लागते, जे अल्झायमरचे मुख्य लक्षण मानले जाते. परिणामी, माणसाची स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता पूर्णपणे प्रभावित होते. शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की, जर अल्झायमरसारख्या गंभीर समस्येपासून दूर राहायचे असेल, तर सर्वप्रथम लठ्ठपणा कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. वजन कमी केल्यामुळे मेंदूमध्ये चरबीशी संबंधित समस्या कमी होत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि मेंदू तंदुरुस्त राखण्यासाठी रोज नियमित व्यायाम करा आणि सकस, पौष्टिक आहाराचे सेवन करा. आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल करून तुम्ही या धोक्यापासून स्वतःचा बचाव करू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news