आता रोबोट करणार डोक्याचे प्रत्यारोपण?

आता रोबोट करणार डोक्याचे प्रत्यारोपण?

वॉशिंग्टन : विज्ञान आणि तंत्रज्ञानत दिवसेंदिवस झपाट्याने प्रगती करत आहेत. यामध्ये रोबोटचा शोध अतिशय क्रांतिकारी मानला जातो. रोबोट सर्वात मोठी आणि अवघड कामेही कमी वेळात अगदी सहजपणे पूर्ण करतो. रोबोटस्मुळे लोकांच्या नोकर्‍या धोक्यात आल्या आहेत, यात काही शंका नाही. पण, त्यामुळे मेडिकल फिल्डमध्येही फार सुधारणा झाल्या आहेत. अलीकडेच, अमेरिकेतील न्यूरोसायन्स आणि बायोमेडिकल अभियांत्रिकी स्टार्टअप ब्रेनब्रिजने दावा केला आहे की, ते जगातील पहिली डोकं प्रत्यारोपण प्रणाली विकसित करत आहेत.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, एक अशी प्रणाली विकसित केली जात आहे, ज्याच्याद्वारे रोबोट थेट एका व्यक्तीचं धड दुसर्‍या व्यक्तीवर प्रत्यारोपण करू शकतील. ब्रेनब्रिज कंपनीच्या वेबसाईटनुसार, हे उपकरण न्यूरोसायन्स, मानवी अभियांत्रिकी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी करेल. या डोकं प्रत्यारोपणाच्या रोबोटिक शस्त्रक्रियेचा एक व्हिडीओही सध्या समोर आला आहे. ब्रेनब्रिज रोबोटच्या साहाय्याने डोके प्रत्यारोपण कशाप्रकारे करण्यात येईल, हे दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

अनिमेटेड व्हिडीओमध्ये दोन सर्जिकल रोबोट एकाच वेळी दोन शरीरांवर काम करताना दिसत आहेत. रोबो एका शरीरातून डोके काढून आणि दुसर्‍या शरीरावर त्याचं प्रत्योरोपण करताना दिसत आहेत. हे तंत्रज्ञान तयार झाल्यास रोबोट शरीरावर कसे कार्य करतील हे अनिमेशन पुढे दाखवण्यात. ब्रेनब्रिजच्या मते, हे तंत्रज्ञान डोकं प्रत्यारोपण करण्याच्या तंत्रासाठी एक क्रांतिकारी संकल्पना आहे. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात यशस्वी डोकं आणि चेहरा प्रत्यारोपण केलं जाऊन त्याचे चांगले परिणाम आणि जलद परिणाम पाहायला मिळतील.

रोबोटिक शस्त्रक्रियेच्या या व्हिडीओवर एका युजरने लिहीले आहे की, आजपर्यंत अशी कोणतीही शस्त्रक्रिया किंवा थेरपी झालेली नाही, ज्यामध्ये एकटा व्यक्ती तुटलेला पाठीचा कणा पुन्हा जोडला जाऊ शकेल, मग एका व्यक्तीचं डोकं दुसर्‍याला बसवण्याचा विषय तर लांबच राहिला. दुसर्‍या युजरने म्हटलं आहे की, हे रोबोट आहेत आणि माणूस नाहीत, जे न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी, ट्रेकोस्टोमी, व्हॅस्कुलर सर्जरी, ऍनेस्थेसिया करू शकतील. यासाठी माणसाची कमांडही आवश्यक आहे. यापैकी कोणतीही गोष्ट स्वतः करू शकेल, असा कोणताही रोबोट आतापर्यंत तयार झालेला नाही, त्यामुळे याचा विचारच सोडून द्या. जे आजपर्यंत कोणत्याही मानवाला जमलं नाही, ते रोबोटला खरंच शक्य होईल का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न नेटकर्‍यांनी उपस्थित केले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news