

फिलाडेल्फिया : येथील 30 वर्षीय डेव्हिन ऐकेनने तिचे आयुष्य बदलण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले. नोव्हेंबर 2024 मध्ये तिने आपल्या नाकाची सर्जरी (राइनोप्लास्टी) केली, ज्यासाठी अंदाजे 11,000 डॉलर्स (9 लाख रुपये) खर्च आला. या सर्जरीमुळे फक्त तिच्या नाकाचा आकारच बदलला नाही, तर तिचा आत्मविश्वासही वाढला. ऐकेन म्हणाली की, सर्जरीनंतर ती तिच्या सर्वात मोठ्या असुरक्षिततेतून मुक्त झाली आणि तिच्या सात वर्षांच्या दुःखी वैवाहिक जीवनाचा शेवट झाला.
सर्जरीनंतर ऐकेनला वाटलं की, तिचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा जास्त वाढला आहे. तिने सोशल मीडियावर तिच्या परिवर्तनाची गोष्ट शेअर केली, जी थोड्याच वेळात जोरदार व्हायरल झाली. तिचा व्हिडीओ टिकटॉकवर 4.5 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला. ऐकेन म्हणाली की, ‘मला आता खूप आनंद होत आहे आणि मला माहीत आहे की, मी माझं उर्वरित आयुष्य आनंदाने जगू शकते.’
डेव्हिन ऐकेनचं जीवन सोपं नव्हतं. शाळेत असताना तिच्या नाकामुळे तिच्या वर्गमित्रांकडून तिची थट्टा केली जात असे. तिला त्रास दिला जात असे आणि टोमणे मारले जात होते, ज्यामुळे तिच्या आत्मविश्वासावर परिणाम झाला आणि ती नैराश्यात गेली. यामुळे तिने 23 व्या वर्षी घाईघाईने रिलेशनशिपमध्ये आली, जे नंतर तिच्यासाठी एक ओझं बनलं. तिने स्पष्ट केलं की, तिच्या पतीला तिचं नाक आवडत होतं. परंतु, सतत वाद आणि मतभेदांमुळे नात्यात तणाव होते. सर्जरीनंतर, डेव्हिनला वाटलं की, आता लग्नाचं नातं संपवण्याची वेळ आली आहे.
तिने घटस्फोट घेतला. त्यानंतर ती आता तिच्या नवीन नाकासह आणि स्वातंत्र्याने तिचं जीवन जगत आहे. ती आता डेट करत आहे आणि पूर्णपणे आनंदी जीवन जगत आहे. तिच्या फॉलोअर्सनी तिच्या सौंदर्याची तुलना बेला हदीद आणि सेलिन डायनसारख्या सेलिब्रिटींशी केली आहे.