

कराची : पाकिस्तानमध्ये सतरा वर्षांपूर्वी आपल्या कुटुंबापासून दुरावलेल्या किरण नावाच्या महिलेची तिच्या कुटुंबाशी एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) च्या मदतीने भेट झाली आहे. लहानपणी घराचा रस्ता विसरलेल्या किरणला अखेरीस तिचे आई-वडील परत मिळाले आहेत.
ही घटना 2008 सालची आहे. इस्लामाबादमध्ये राहणारी किरण आपल्या वस्तीतून आईस्क्रीम घेण्यासाठी घराबाहेर पडली होती. ती रस्ता विसरली आणि तिला तिचा पत्ता आठवत नव्हता, त्यामुळे ती रडू लागली. तेव्हा एका महिलेने तिला इस्लामाबादच्या एधी सेंटरमध्ये नेले. काही काळानंतर बिलकिस एधी यांनी तिला कराची येथे आणले, जिथे तिचे पालनपोषण एधी शेल्टर होममध्ये झाले. किरण जवळपास 17 वर्षे याच शेल्टर होममध्ये राहिली.
एधी फाऊंडेशनने अनेक वेळा इस्लामाबादला जाऊन तिच्या आई-वडिलांना शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापल्या; पण कोणतीही माहिती मिळाली नाही. अनेक वर्षे कुटुंबाचा कोणताही सुगावा लागला नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, फाऊंडेशनने पंजाबच्या सेफ सिटी प्रोजेक्टचे सायबर सुरक्षा तज्ज्ञ नबील अहमद यांची मदत मागितली. नबील यांना किरणचे सध्याचे फोटो आणि तिच्या लहानपणाशी संबंधित काही माहिती देण्यात आली. त्यांनी जुने पोलिस रेकॉर्ड तपासले आणि फेसियल रिकग्निशनसारख्या ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने किरणच्या कुटुंबाचा शोध घेतला.
यानंतर, किरणचे वडील अब्दुल मजीद, जे पेशाने शिंपी (दर्जी) आहेत, कराचीला पोहोचले आणि आपल्या मुलीला सोबत घेऊन गेले. त्यांनी सांगितले की, ते अनेक वर्षे तिचा शोध घेत होते; पण काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी आशा सोडली होती. किरण ही एधी शेल्टर होममधील पाचवी मुलगी आहे, जिच्या कुटुंबाचा शोध ‘एआय’ आणि पोलिसांच्या मदतीने लागला आहे. फाऊंडेशन आता देशातील विविध सेफ सिटी प्रोजेक्टस्सोबत मिळून अशा प्रकरणांमध्ये अधिक वेगाने काम करण्याची तयारी करत आहे.