Box jellyfish | सिंगापूरजवळ विषारी ‘बॉक्स जेलीफिश’ची नवीन प्रजाती; मानवासाठी ठरू शकते जीवघेणी

Box jellyfish |
Box jellyfish | सिंगापूरजवळ विषारी ‘बॉक्स जेलीफिश’ची नवीन प्रजाती; मानवासाठी ठरू शकते जीवघेणी
Published on
Updated on

सिंगापूर : शास्त्रज्ञांनी अत्यंत विषारी असलेल्या ‘बॉक्स जेलीफिश’च्या एका नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. 2020 आणि 2021 दरम्यान सिंगापूरच्या एका बेटाजवळ आढळून आलेल्या नमुन्यांच्या आधारे या प्रजातीचे वर्गीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ज्या बेटाजवळ ही जेलीफिश सापडली, त्याचे पूर्वीचे नाव ‘पुलाऊ ब्लाकांग माती’ म्हणजेच मलय भाषेत ‘पाठीमागील मृत्यूचे बेट’ असे होते.

या नवीन प्रजातीला ‘चिरोनेक्स ब्लाकांगमाती’ (Chironex blakangmati) असे नाव देण्यात आले आहे. 1972 मध्ये या बेटाचे नाव बदलून ‘सेंटोसा’ करण्यात आले, ज्याचा अर्थ ‘शांतता आणि समृद्धी’ असा होतो. मात्र, हा जीव अत्यंत धोकादायक आणि विषारी असल्याने शास्त्रज्ञांनी सेंटोसा ऐवजी या बेटाच्या जुन्या आणि भयानक नावावरूनच त्याचे नामकरण करणे योग्य मानले. ‘चिरोनेक्स’ समूहातील बॉक्स जेलीफिशच्या आतापर्यंत केवळ चार प्रजाती माहीत असून, त्या सर्वच्या सर्व प्रचंड विषारी आहेत. त्यांच्या स्पर्शिकांवर (tentacles) ‘नेमॅटोसिस्टस्’ नावाच्या विशेष पेशी असतात, ज्यांच्या माध्यमातून त्या दंश करतात. हा दंश इतका शक्तिशाली असतो की त्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो. इतर सामान्य जेलीफिशप्रमाणे या केवळ पाण्याच्या प्रवाहावर तरंगत राहण्याऐवजी, त्यांच्या मजबूत स्नायू रचनेमुळे आणि जटिल डोळ्यांमुळे शिकार ओळखू शकतात आणि तिच्या दिशेने वेगाने पोहू शकतात.

यापूर्वी शास्त्रज्ञ या जेलीफिशला ‘चिरोनेक्स यामागुची’ (C. yamaguchii) या दुसर्‍या एका प्रजातीचा जीव समजत होते. परंतु, 15 मे रोजी ‘रॅफल्स बुलेटिन ऑफ झूलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका नवीन संशोधनानुसार, या जेलीफिश आनुवंशिक आणि शारीरिक रचनेच्या द़ृष्टीने पूर्णपणे भिन्न असल्याचे सिद्ध झाले आहे. या अभ्यासाच्या सह-लेखिका आणि जपानमधील तोहोकू विद्यापीठातील सागरी जीवशास्त्राच्या प्राध्यापिका चेरिल एम्स यांनी सांगितले की, ‘चिरोनेक्स ब्लाकांगमाती ही प्रजाती दिसायला हुबेहूब ‘चिरोनेक्स यामागुची’ सारखीच दिसते (ज्याचा शोध मी माझ्या मास्टर्सच्या शिक्षणादरम्यान ओकिनावामध्ये लावला होता). परंतु, तुलनात्मक अभ्यासासाठी जेव्हा आम्ही ओकिनावामधील जुने नमुने पुन्हा तपासले, तेव्हा या दोन्ही प्रजाती एकमेकांपासून पूर्णपणे वेगळ्या असल्याचे आमच्या लक्षात आले.’

संशोधकांना असे आढळून आले की, या नवीन प्रजातीच्या छत्रीसारख्या (घंटाकृती) शरीराच्या खालच्या भागात शाखायुक्त नलिकांची रचना नाही, जी ‘चिरोनेक्स’च्या इतर तीन प्रजातींमध्ये (‘सी. यामागुची’, ‘सी. फ्लेकेरी’ आणि ‘सी. इंद्रासाक्षाज्या’) आढळते. या नलिका त्यांच्या स्नायूंना बळकट करणार्‍या भागामध्ये असतात, ज्याच्या मदतीने बॉक्स जेलीफिश पाण्यात पुढे पोहतात. ही शारीरिक भिन्नता आणि आनुवंशिक फरक यामुळे ही एक वेगळीच प्रजाती असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news