

वॉशिंग्टन : संशोधकांनी प्रयोगशाळेत अनेक 'मिनी ब्रेन्स' विकसित केले आहेत. त्यांच्यामुळे आता 'ट्रॉमॅटिक ब्रेन इंज्युरीज' (टीबीआय) कशाप्रकारे लोकांमध्ये डिमेन्शियाचा धोका वाढवतात हे समजून घेण्यास मदत मिळेल. 'ट्रॉमॅटिक ब्रेन इंज्युरीज' म्हणजे अपघात किंवा तत्सम कारणांमुळे मेंदूला होणारी क्लेशदायक गंभीर इजा. अशाप्रकारची इजा झालेल्या व्यक्तीस विस्मरणाशी संबंधित डिमेन्शिया हा आजार जडण्याचा धोका असतो. आता याबाबतचे आता नवे संशोधन होऊ शकते.
'सेल स्टेम सेल' या नियतकालिकात याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. संशोधकांनी प्रयोगशाळेत मानवी मेंदूचे नमुने विकसित केले आहेत. त्यांना 'सेरेब्रल ऑर्गनॉईडस्' असे म्हटले जाते. त्यांच्यामध्ये संशोधकांनी अतिशय तीव्र अशा अल्ट्रासाऊंड वेव्जचा मारा केला. ट्रॉमॅटिक ब्रेन इंज्युरी जशी असते तशा पद्धतीची इजा या माध्यमातून करण्यात आली. त्यानंतर मेंदूच्या अशा दुखापतीचा खोलवर परिणाम होण्यापासून रोखण्यात आले. ही उपचार पद्धत प्रतिबंधात्मक रूपात किंवा जखम झाल्यानंतर थेरपीच्या स्वरूपात वापरता येऊ शकते. अर्थात, यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे.
त्यानंतरच प्रत्यक्ष रुग्णांवर अशा पद्धतीचा वापर करता येऊ शकेल. त्याद़ृष्टीने आता पावले पडू लागली आहेत. 'सेरेब्रल ऑर्गनॉईडस्' म्हणजे मानवी मेंदूची 'फूल-साईज' प्रतिकृती नव्हे. हे मेंदूच्या पेशींचे टाचणीच्या टोकाइतक्या आकाराचे छोटे समूह असतात. मात्र, मेंदूशी संबंधित संशोधन प्रयोगशाळेतील उंदरांवर करण्याऐवजी प्रत्यक्ष अशा 'सूक्ष्म मानवी मेंदूं'वर करणे अधिक लाभदायक ठरते.