

ब्लूमिंग्टन (अमेरिका) : भूकंप विज्ञानाच्या क्षेत्रात एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक शोध लागला आहे. प्रशांत महासागराच्या तळाशी असणार्या एका महाकाय फॉल्टमध्ये (भूगर्भीय तडे किंवा जोड) भूकंपाची तीव्रता मर्यादित ठेवणारी नैसर्गिक यंत्रणा शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. या फॉल्टमध्ये असलेल्या विशिष्ट ब्रेक झोन्समुळे (बॅरियर झोन्स) समुद्राचे पाणी आणि खडकांची रचना एकत्र येऊन भूकंपाचा विस्तार रोखतात, त्यामुळे संभाव्य महाभयंकर विनाश टळतो. प्रसिद्ध ‘सायन्स’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
इक्वेडोरच्या पश्चिमेला सुमारे 1,000 मैल अंतरावर महासागराच्या तळाशी गोफार ट्रान्सफॉर्म फॉल्ट नावाचा एक मोठा भूगर्भीय जोड आहे. या ठिकाणी गेल्या 30 वर्षांपासून एक अद्भुत घटना घडत होती. दर 5 ते 6 वर्षांनी येथे अगदी अचूकपणे 6 रिश्टर स्केल तीव्रतेचाच भूकंप येत होता. या भूकंपाची जागा आणि तीव्रता दरवेळी तिच असायची. भूकंप विज्ञानात एवढी अचूकता अत्यंत दुर्मीळ मानली जाते. हा भूकंप दरवेळी 6 रिश्टर स्केलवरच का थांबतो आणि त्यापेक्षा मोठा का होत नाही? या प्रश्नाने शास्त्रज्ञांना चक्रावून सोडले होते. आता इंडियाना युनिव्हर्सिटीच्या टीमने या रहस्याचा छडा लावला आहे. त्यासाठी शास्त्रज्ञांनी पॅसिफिक महासागराच्या तळाशी अत्यंत संवेदनशील ओशन बॉटम सिस्मोमीटर बसवले.
या यंत्रांनी हजारो अतिसूक्ष्म भूकंपांची नोंद घेतली. संशोधनात असे दिसले की, ज्या भागात भूकंप सुरू होऊन थांबतो, त्या दोन्ही बाजूंच्या मध्यभागी बॅरियर झोन्स (अडथळा क्षेत्र) आहेत. हे झोन्स भूकंपाचा वेग रोखतात. या भागात मुख्य फॉल्ट तुकड्यांमध्ये विभागला गेला आहे. जेव्हा फॉल्टमध्ये हालचाल होऊन मोठा भूकंप सुरू होतो, तेव्हा पाणी भरलेल्या खडकांच्या आतील दाब झपाट्याने कमी होतो. त्यामुळे सच्छिद्र खडक तात्पुरते एकमेकांमध्ये घट्ट लॉक (जाम) होतात. एखाद्या कारच्या ब्रेकप्रमाणे ही यंत्रणा काम करते आणि भूकंपाचा हादरा पुढे पसरण्यापासून आणि मोठा होण्यापासून रोखते. या प्रक्रियेला डायलेटन्सी स्ट्रेंथनिंग प्रक्रिया म्हणतात.