मेघालयात आहेत ‘जिवंत’ पूल!

मेघालयात आहेत ‘जिवंत’ पूल!

शिलाँग : ईशान्येकडील सुंदर राज्य असलेल्या मेघालयात अनेक वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. सर्वात स्वच्छ नदी, सर्वात स्वच्छ गाव अशी वैशिष्ट्येही याच ठिकाणी आहेत. सर्वाधिक पर्जन्यमान असलेले ठिकाणही याच राज्यात आहे. याच राज्याचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे नद्यांवरील वृक्षांच्या मुळांपासून तयार झालेला नैसर्गिक पूल. जुन्या काळापासूनच तिथे असे पूल बांधले जातात व या परंपरेला 'लिव्हिंग रूट हेरिटेज' असेही म्हटले जाते. हा एक निसर्गाचा अद्भूूत आविष्कारच आहे. स्थानिक भाषेत या पुलांना 'जिंग किंग री' असे म्हटले जाते.

मेघालयातील बहुतांश भाग हा अत्यंत अवघड असा पहाडी आणि दर्‍या-खोर्‍यांचा भाग आहे. पावसाळ्यात या प्रदेशात मुसळधार पाऊस पडतो. नैऋत्य मान्सून ज्यावेळी मेघालयातील गारो, खासी आणि जैंतिया या तीन पर्वतांमध्ये फसतो, त्याला कुठेही बाहेर पडायला मार्ग राहत नाही त्यावेळी तो या प्रदेशात तुफान बरसतो. त्यामुळे हा प्रदेश म्हणजे भारतातील सर्वाधिक पावसाचे एक ठिकाण आहे. या अशा बसरणार्‍या प्रदेशात अभियंते सिमेंटचे किंवा स्टीलचे पूल बांधू शकत नाहीत, त्यांना अनेक मर्यादा आहेत; पण निसर्गाला कोणत्याही मर्यादा नाहीत. त्यामुळे या ठिकाणी निसर्गानेच मानवाची मदत केल्याचे दिसून येते. या प्रदेशातील नद्यांच्या किनारी वडाची आणि रबराची झाडे मुबलक प्रमाणात उगवतात. वडाची झाडे मोठी झाल्यानंतर त्याच्या पारंब्या लोंबकळतात. मग त्या पारंब्यांच्या मदतीने या नद्यांवर 'रूट ब्रीज' तयार करण्यात आले.

वडाच्या पारंब्यांची नैसर्गिक इलॅस्टिसिटी जी असते ती या पुलांना अत्यंत मजबूत करते. या पारंब्या एकमेकांमध्ये अडकून वाढल्यानंतर त्यांच्यावर बांबू किंवा सुपारीची झाडे टाकली जातात. नंतर त्यावर दगडं रचली जातात, माती टाकली जाते आणि हे पूल चालण्यायोग्य केली जातात. रबराच्या झाडांचेही तसेच. त्याची मुळे मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर त्याचा वापर पूल तयार करण्यासाठी होतो. या प्रक्रियेने हे रूट ब्रीज पूर्ण करायचे झाले तर दहा वर्षांहून अधिक कालावधी लागतो; पण एकदा का हे पूल तयार झाले तर ते पाचशे वर्षे त्याला कोणताही धोका नसतो. हा पूल तयार करण्यासाठी कोणतीही आर्थिक किंमत मोजावी लागत नाही किंवा त्याच्या मेन्टेनन्सची चिंता नसते.

या भागातील अनेक पुलांची लांबी ही 50 फुटांहून जास्त लांब आहे आणि याची रुंदी 5 ते 8 फूट इतकी आहे. हे पूल तुटेल, मोडेल किंवा ढासळेल याची अजिबात चिंता नाही कारण वडाच्या पारंब्यांनी ते एवढं मजबूत झालेलं असतं की त्यावर एकाचवेळी अनेक लोक उभे राहू शकतात. निसर्ग आणि मानवाच्या संबंधाचे सुंदर उदाहरण असणारे हे लिव्हिंग रूट ब्रीज मेघालयातील वेस्ट जैंतिया हिल्स जिल्हा आणि ईस्ट खासी हिल्स जिल्ह्यामध्ये दिसतील. या प्रदेशात खासी आणि जैंतिया जमातीचे लोक राहतात. या लोकांनी या पुलाची निर्मिती केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news