New Horizons Spacecraft | ‘न्यू होरायझन्स’ यान ३२१ दिवसांच्या ‘निद्रे’नंतर पुन्हा झाले सक्रिय!

New Horizons Spacecraft |
New Horizons Spacecraft | ‘न्यू होरायझन्स’ यान ३२१ दिवसांच्या ‘निद्रे’नंतर पुन्हा झाले सक्रिय!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : प्रवासात झोप लागल्यानंतर अचानक जाग यावी आणि आपण प्लूटोच्या कक्षेच्याही अब्जावधी मैल पलीकडे पोहोचलो आहोत याची जाणीव व्हावी, यापेक्षा जास्त चकित करणारा अनुभव दुसरा कोणता असू शकत नाही. सौरमालेच्या टोकावर गेल्या वर्षभरापासून सुप्तावस्थेत असलेल्या नासाच्या ‘न्यू होरायझन्स’ या अवकाशयानाला वैज्ञानिकांनी पुन्हा यशस्वीरीत्या जागे केले असून, या यानाची सर्व यंत्रणा उत्तम स्थितीत कार्यरत आहे. तब्बल ३२१ दिवसांच्या प्रदीर्घ निद्रेनंतर जागे झालेले हे यान आता पुन्हा एकदा वैज्ञानिक माहिती (Data) पृथ्वीवर पाठवू लागले आहे. जिथे सूर्याचे साम्राज्य संपते आणि ‘आंतरतारकीय अवकाश' (Interstellar Space) सुरू होते, त्या गूढ सीमेचा अभ्यास करण्याच्या आपल्या मोहिमेसाठी न्यू होरायझन्स आता पूर्णपणे सज्ज झाले आहे.

जॉन हॉपकिन्स ॲप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरीमधील न्यू होरायझन्स मोहिमेच्या ऑपरेशन्स मॅनेजर ॲलिस बोमन यांनी सांगितले, ‘‘सुप्तावस्थेच्या या संपूर्ण कालावधीत प्रत्येक आठवड्याला मिळालेले सर्व स्टेटस रिपोर्ट ‘ग्रीन’ होते, म्हणजेच अवकाशयानातील सर्व यंत्रणा अत्यंत सुरक्षित आणि व्यवस्थित कार्यरत होत्या.’’ ‘न्यू होरायझन्स'चे प्रक्षेपण २००६ मध्ये झाले होते. प्रक्षेपणाच्या वेळी ताशी सुमारे ५८,५०० कि.मी. (३६,४०० मैल) वेग प्राप्त करून या यानाने इतिहास रचला होता.

सौरमालेच्या सीमेकडे जाताना, या यानाने २००७ मध्ये गुरू ग्रहाच्या जवळून जाताना आणि पुढे २०१५ मध्ये प्लूटोला ओलांडताना आपल्या वेगात आणखी वाढ केली. सध्या हे अवकाशयान पृथ्वीपासून सुमारे ९.५ अब्ज किलोमीटर (५.९ अब्ज मैल) अंतरावर आहे. हे अंतर पृथ्वी आणि सूर्यामधील अंतराच्या सुमारे ६४ पट (64 Astronomical Units - AU) आहे. १९७७ मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेल्या ‘व्हॉयेजर' या जुळ्या अवकाशयानांनंतर, 'न्यू होरायझन्स' हे विश्वात सर्वात दूर अंतरावर कार्यरत असलेले एकमेव अवकाशयान ठरले आहे. (यापूर्वी 'पायोनियर १०’ आणि 'पायोनियर ११' ही याने यापेक्षा जास्त लांब गेली असली, तरी कित्येक दशकांपूर्वीच त्यांचे कार्य बंद पडले आहे.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news