Nasa : मंगळ ग्रहावर ऑक्सिजन तयार करण्यात यश

Nasa : मंगळ ग्रहावर ऑक्सिजन तयार करण्यात यश
Published on
Updated on

वॉशिंग्टन : मंगळ ग्रहावर ऑक्सिजन तयार करण्यात 'नासा'च्या संशोधकांना यश आले आहे. 'नासा'ने मंगळावर पाठवलेल्या टोस्टरच्या आकाराच्या एका उपकरणाने प्रथमच मंगळाच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन तयार केला आहे. मंगळावर प्राणवायू तयार करण्यात यश आल्याने भविष्यात माणसाला मंगळभूमीवर जाणे शक्य होणार आहे.

याबाबतची माहिती 'सायन्स' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या वर्षी पर्सिव्हरन्स या रोव्हरबरोबरच 'मोक्सी' (मार्स ऑक्सिजन इन-सितू रिसोर्स यूटिलायझेशन एक्सपिरिमेंट) हे उपकरण मंगळावर पाठवण्यात आले होते. संशोधकांच्या माहितीनुसार, फेब्रूवारी 2021 पासून सातत्याने मंगळावरील कार्बन डायऑक्साईडचे अधिक प्रमाण असलेल्या वातावरणात 'मोक्सी'ने ऑक्सिजनची निर्मिती करण्यात यश मिळवले आहे. 'मोक्सी' हे उपकरण विविध प्रकारच्या वातावरणात ऑक्सिजन तयार करू शकतो. हे उपकरण मंगळावरील कोणत्याही वातावरणात, रात्री किंवा दिवसाही आपल्या कामात यशस्वी ठरले आहे. या उपकरणावर सात प्रयोग करण्यात आले. त्यामध्ये प्रत्येकवेळी ताशी 6 ग्रॅम ऑक्सिजन तयार करण्यात आला. पृथ्वीवर इतका ऑक्सिजन एखादे छोटे झाड तयार करते. एकदा तर या उपकरणाने ताशी 10.4 ग्रॅम ऑक्सिजन तयार केला.

मंगळाच्या वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 96 टक्के आहे. 'मोक्सी' या वायूला एका फ्यूएल सेलमधून पाठवून 798.9 अंश सेल्सिअसवर तापवतो. त्यानंतर कार्बन डायऑक्साईडमधून कार्बन मोनॉक्साईड आणि ऑक्सिजनचे अणू विजेच्या मदतीने विभक्‍त करतो. या ऑक्सिजन अणूंपासून प्राणवायू तयार होतो. मॅसाच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील 'मोक्सी' मोहिमेचे प्रमुख वैज्ञानिक मायकल हेच यांनी सांगितले की मंगळावरील हवा अत्यंत विरळ आहे. ती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एक लाख फूट उंचीवर जशी असते तशी आहे. त्यानंतरही हे उपकरण इतके चांगले काम करीत आहे हे आमच्यासाठी मोठेच यश आहे.

आता वैज्ञानिक 'मोक्सी'चे जम्बो व्हर्जन तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या मते, या उपकरणाच्या शंभर पट मोठे व्हर्जन तयार करण्यात यश आले तर मंगळावर एकाचवेळी शेकडो वृक्षांइतका ऑक्सिजन तयार करता येईल. अशा मोठ्या उपकरणातून ताशी 1 ते 3 किलोग्रॅम ऑक्सिजन तयार होईल. 'मोक्सी'च्या या यशामुळे मंगळभूमीवर मनुष्याला पाठवणे व त्यांना स्वयंपूर्ण बनवणे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news