

अॅडलेड : दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या आकाशात पहाटे दोन प्रकाशाचे झोत एकमेकांत गुंफलेल्या अवस्थेत वेगाने जाताना दिसले. हे द़ृश्य पाहून नागरिकांमध्ये घबराट आणि कुतूहल निर्माण झाले होते. अनेकांनी ही यूएफओ किंवा परग्रहावरील जीवांची हालचाल असल्याचा दावा केला. मात्र, शास्त्रज्ञांनी यामागचे खरे आणि वैज्ञानिक कारण स्पष्ट केले आहे.
शुक्रवारी 13 फेबु्रवारीला सकाळी साधारण 6 च्या सुमारास दक्षिण ऑस्ट्रेलियातील विविध भागांतून आकाशात एक विचित्र प्रकाश दिसला. दोन प्रकाशाचे किरण एकमेकांभोवती फिरत पुढे सरकत असल्याचे फोटोंमध्ये दिसत होते. हा प्रकाश दिसताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले. काहींनी याला परग्रहावरील विमान म्हटले, तर काहींनी हे हेरगिरी करणारे विमान असल्याचा संशय व्यक्त केला. अगदी मजेशीरपणे, एकाने तर लाईट जॅकेट घातलेला कबूतर असाही तर्क लावला!
अंतराळ तज्ज्ञांनी या घटनेच्या फुटेजची पाहणी केल्यानंतर असे स्पष्ट केले की, हा प्रकाश कोणत्याही एलियनचा नसून एका रॉकेट प्रक्षेपणाचा परिणाम होता. दक्षिण अमेरिकेतील फ्रेंच गयाना येथील स्पेसपोर्टवरून युरोपच्या एरियान 6 या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले होते. हे रॉकेट ऑस्ट्रेलियात प्रकाश दिसण्याच्या साधारण 3 तास आधी झेपावले होते. अॅमेझॉन कंपनीचे हे रॉकेट 32 उपग्रह कक्षेत स्थापित करण्यासाठी पाठवण्यात आले होते. रॉकेट जेव्हा अवकाशात जाते, तेव्हा त्याच्या इंधनाचे ज्वलन आणि वातावरणातील बदलांमुळे अशा प्रकारचे प्रकाशाचे झोत (रॉकेट प्लंब्स) तयार होतात, जे शेकडो मैल दुरूनही दिसू शकतात.