

लंडन : युनायटेड किंगडममधील एका छोट्याशा गावात जमिनीखालील अनेक रहस्ये दडलेली जादुई गुहा आहे. यातील संभ्रमित करणारे मार्ग, हे या गुहेचे ठळक वैशिष्ट्य.
ही गुहा पाच लाख वर्षे जुनी आहे, असे मानले जाते. अतिशय कमी लोकांनी या गुहेतील तळघरात अनेक चमत्कारिक घटक पाहिले आहेत. या गुहेत जाण्याचा रस्ता देखील अगदी चिंचोळी आहे.
ही गुहा फ्लिंटशायरमध्ये नॉर्थ वेल्स या छोट्याशा गावात सिल्केनमध्ये जमिनीखाली दडलेली आहे. या गुहेत कित्येक शतके कोणी पोहोचू देखील शकले नव्हते. 1978 मध्ये नॉर्दर्न पेनिन केविंग क्लबचे काही सदस्य सर्वप्रथम या गुहेत गेले. त्यापूर्वी कोणाला या गुहेचा पत्ता देखील नव्हता.
त्यानंतर मात्र या गुहेवर बरेच संशोधन झाले व त्यात काही थक्क करणार्या ठिकाणांचा शोध लागला. वेल्स भाषेत या गुहेला ओगोफ हेन फफिनोनौ या नावाने ओळखले जाते. याचा अर्थ झर्यांची गुहा असा होतो. ही गुहा पोचर्स गुहा या नावाने देखील प्रचलित आहे. या गुहेच्या आत अडीच लाख वर्षांपूर्वी एक नदी वाहत असे. ती आता आटली आहे, असे युनायटेड केवर्स एक्स्प्लोरेशन टीम सेक्रेटरी इयान अॅडम्सनी याप्रसंगी सांगितले.
गुहेच्या प्रवेशद्वाराखाली डायर एडिट नावाची खाण होती. तेथे 19 व 20 व्या शतकातील शिशाचा शोध अपयशी ठरला. गुहेच्या केंद्रस्थानी स्टॅलेग्माईट आहे. गुहाच्या छतावर कॅल्शियमयुक्त पाणी संथ गतीने गळते. गुहेत समुद्री जीव लिम्पेटचे जीवाष्म देखील आढळले आहेत. याशिवाय, गुहेत काही ठिकाणी कॅल्शियम नायट्रेट देखील आढळून आले असून त्याला मून मिल्क या नावाने ओळखले जाते.