

कॅलिफोर्निया : टोमॅटोचे वाढते भाव सर्वसामान्यांसाठी चिंतेत भर घालणारे असतात, असे म्हटले तर ते गैर ठरू नये. काही कालावधीपूर्वी याच टोमॅटोचे भाव अक्षरश: गगनाला भिडले आणि त्यामुळे स्वयंपाकघरातून टॉमेटो जणू हद्दपारच झाला. पण, जगात टोमॅटोची बरीच विविधता आहे आणि इतके कमी की काय, म्हणून एका टोमॅटोच्या जातीतील बियांची किंमत आलिशान कारपेक्षाही अधिक महागडी आहे. वाचून आश्चर्य वाटेल, पण या खास टोमॅटोच्या बियांची किंमत थोडीथोडकी नव्हे, तर चक्क तीन कोटी रुपयांच्या घरात आहे.
हजेरा जेनेटिक्सने विकलेल्या टोमॅटोचा हा किस्सा आहे. टोमॅटोच्या या प्रकाराच्या एक किलो बियांची किंमत 3 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्टस्नुसार, खास बियांसाठी ओळखला जाणारा हाजेरा टोमॅटोच्या सुधारित बियांसाठी ओळखला जातो. आजकाल त्याच्या खास उन्हाळी सूर्य टोमॅटोच्या बिया अनेक लोक खरेदी करत आहेत, त्याच्या किमतीत अनेक किलो सोने खरेदी केली जाऊ शकते. विशेष म्हणजे टोमॅटोच्या एका बीपासून 20 किलो टोमॅटोचे पीक घेता येते.
आता प्रश्न पडेल की, जी पिके घेतली जातात त्यांच्या बियांचे जतन का होत नाही? याचे उत्तर असे की, या पिकापासून तयार होणारे टोमॅटो हे बिया नसलेले असतात. त्यामुळे जेव्हा-जेव्हा शेतकर्यांना या टोमॅटोची लागवड करावी लागते, तेव्हा त्यांना प्रत्येक वेळी नवीन बियाणे खरेदी करावे लागते. या टोमॅटोच्या बियांचे जतन करण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया राबवावी लागते आणि त्यामुळे त्याची किंमत बरीच महागडी आहे.