

नवी दिल्ली : एके काळी लिहिण्याची सामग्री म्हणजे टाक आणि शाईचा दौत ही असायची. पेनाचा शोध लागल्यानंतर फौंटन पेन, बॉल पॉईंट पेन असे प्रकार निर्माण झाले. पाच रुपयांपासून दोनशे-तीनशे रुपयांनाही पेन मिळतात. मात्र, जगात अत्यंत महागडेही पेन पाहायला मिळतात. त्यामध्ये फुलगोर नॉक्टर्नस नावाच्या एका पेनाचा समावेश होतो. या पेनाची किंमत 80 लाख डॉलर्स इतकी आहे. भारतीय चलना ही किंमत 60 कोटी रुपये इतकी होते!
2010 मध्ये शांघायमध्ये एका लिलावादरम्यान हा पेन 80 लाख डॉलर्समध्ये विकण्यात आला होता. हा पेन तयार करण्यासाठी सोने आणि काळ्या हिर्यांचा वापर करण्यात आला. लक्झरी पेन निर्माता कंपनी मोंटब्लॅकचा बोहेम रॉयल पेनही आपल्या मोठ्या किमतीसाठी ओळखला जातो. हा पेन 18 कॅरेट पांढर्या सोन्यापासून बनवण्यात आला आहे. त्याच्या वरील भागावर हिरे जडवण्यात आले आहेत. या पेनची किंमत 1.5 दशलक्ष डॉलर्स आहे. भारतीय चलनात ही किंमत सुमारे 8 कोटी रुपये इतकी होते. अनेक श्रीमंत लोकांना अशा सुंदर कलाकृतीसारख्या असणार्या महागड्या वस्तू खरेदी करून त्यांचा संग्रह करण्याचा छंद असतो. त्यामुळे ते असे पेनही खरेदी करीत असतात.