जगातील सर्वात महागडी अंडी

जगातील सर्वात महागडी अंडी

जगभरात सर्वाधिक खाल्ल्या जाणार्‍या अन्नपदार्थांपैकी एक म्हणजे अंडी. जगात सर्वत्र कोंबडीची अंडी सर्वाधिक प्रमाणात खाल्ली जातात. याशिवाय बदक, शहामृग अशा विविध पक्ष्यांचीही अंडी खाल्ली जातात. मात्र, कोंबडीची अंडीच सहसा लोकांच्या नेहमीच्या आहारात असतात. ही अंडी सर्वसामान्यांच्या आवाक्यातही असतात. जगात काही अंडी अशीही आहेत ज्यांची किंमत अव्वाच्या सव्वा आहे! अर्थात ईस्टरसारख्या काही विशेष प्रसंगी मौल्यवान वस्तूंपासून बनवलेली ही कृत्रिम अंडी आहेत. अशा जगातील सर्वात महागड्या काही अंड्यांची ही माहिती…

रोथस्चाईल्ड फेबर्ज ईस्टर एग :

जगातील सर्वात महागडे अंडे रोथस्चाईल्ड फेबर्ज ईस्टर हे आहे. या अंड्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. जणू सर्वसामान्य व्यक्तीला तर या अंड्याचे स्वप्नही महागात पडेल. या अंड्याची किंमत 9.6 दशलक्ष डॉलर्स आहे. भारतीय रुपयांमध्ये याची किंमत सुमारे 78 कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल. रोथस्चाईल्ड फेबर्ज ईस्टर अंडे पूर्णपणे हिरेजडीत आहे. या ईस्टर अंड्यावर अनेक प्रकारचे हिरे जडलेले आहेत. यासोबतच हे अंडे सोन्याने मढवलेले आहे. त्यामुळे अर्थातच हे अंडे खाण्यायोग्य नाही. हे एक कृत्रिम अंडे शोभेची वस्तू आहे!

मिराज ईस्टर एग :

यानंतर जगातील दुसरे महागडे अंडे मिराज इस्टर एग आहे. या अंड्याची किंमत 8.4 दशलक्ष डॉलर्स आहे. म्हणजेच, भारतीय रुपयात सुमारे 69 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 18 कॅरेट सोन्याने बनवलेल्या या अंड्यावर 1000 हिरे जडवलेले आहेत. हे अंडे पाहिल्यावर एक मोठा हिरा चमकत असल्याचा भास होतो.

डायमंड स्टेला ईस्टर एग :

डायमंड स्टेला इस्टर एग जगातील तिसर्‍या क्रमांकाचे महागडे अंडे आहे. या अंड्याची किंमत सुमारे 82 लाख रुपये आहे. हे देखील जगातील सर्वात महाग इस्टर अंड्यांपैकी एक आहे. हे अंडे चॉकलेटसारखे दिसते; पण अंड्यावरही हिरे आणि सोन्याचे नक्षीकाम करण्यात आले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news