जगातील सर्वात महागडे नाणे!
वॉशिंग्टन : पैशाने सोने-चांदी खरेदी केले जात असते, पण पैसेही सोन्या-चांदीपासून बनलेले असू शकतात. प्राचीन काळी अशी नाणी, मोहरा बनवल्या जात असत. काही नाणी ही खरोखरच विशेष असतात. अशा नाण्यांची किंमतही मोठीच असते. मात्र, जगातील सर्वात महागडे नाणे कोणते आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जगातील सर्वात महागड्या नाण्याचे नाव आहे 'सेंट-गॉडन्स डबल ईगल'. अशी नाणी अमेरिकेत सन 1907 ते 1933 दरम्यान तयार करण्यात आली होती. एका लिलावात अशा नाण्याला तब्बल 163 कोटी रुपयांची किंमत मिळाली!
त्या काळात अशी 4,45,500 नाणी बनवण्यात आली होती. त्यावर ऑगस्टस सेंट गॉडन्स यांची प्रतिमा कोरलेली होती. सध्या अशी केवळ बारा नाणीच उपलब्ध आहेत. अमेरिकेत झालेल्या एका लिलावावेळी अशाच एका नाण्याला 163 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. जगातील दुसर्या क्रमांकाच्या सर्वात महागड्या नाण्याचे नाव आहे 'फ्लोईंग हेअर सिल्व्हर डॉलर'. ही नाणी सन 1794 मध्ये बनवण्यात आली होती. त्यावेळी अशी केवळ 1758 नाणी बनवली होती. सध्या त्यापैकी केवळ सहा नाणीच उपलब्ध आहेत. लिलावात यामधील एका नाण्याला 107.57 कोटी रुपयांची किंमत मिळाली. जगातील तिसर्या क्रमांकाचे सर्वात महागडे नाणे 'ब्रेशर डब्लून' या नावाने ओळखले जाते. 1787 मध्ये न्यूयॉर्कमधील एक सोनार इफ्रेम ब्रेशर यांनी ही नाणी बनवली होती. सध्या अशी सात नाणीच उपलब्ध आहेत. त्यापैकी एका नाण्याची किंमत 80.89 कोटी रुपये आहे.